छत्रपती संभाजीनगर : निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कामात हलगर्जीपणा करणे शासकीय कर्मचाऱ्यांना चांगलंच महागात पडला आहे. कारण या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) दहा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारंवार संपर्क करून सुद्धा हे कर्मचारी कामावर हजर न झाल्याने, तहसीलदारांच्या आदेशाने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील सिटी चौक पोलिसात (City Chowk Police) हा गुन्हा दाखल केला गेला आहे. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.


भारत निवडणुक आयोगाने जाहीर केलेल्या संक्षिप्त पुनरिक्ष कार्यक्रमात हलगर्जी करणाऱ्या दहा कर्मचाऱ्यांवर छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक अधिकारी तहसीलदार रमेश मुंडलोड यांच्या आदेशाने सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, गुन्हा दाखल झालेल्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांचाही समावेश आहे.


भारत निवडणुक आयोगाच्या आदेशाने जिल्ह्यात सध्या संक्षिप्त पुररिक्षन कार्यक्रम सुरू आहे. त्यासाठी निवडणुक आयोगाने प्रत्येक विभागाच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश तहसील कार्यालयाला दिले आहेत. त्यानुसार गारखेडा परिसरातील गजानन बहुउद्देशिय शाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालय, विद्यापीठ तसेच नारेगाव मनपा शाळेतील कर्मचाऱ्यांना नियुक्त केले होते. मात्र वारंवार पत्रव्यवहार तसेच संपर्क करूनही हे कर्मचारी कामावर हजर झाले नाही. त्यामुळे निवडणुक कामात अडथळा निर्माण झाला. अखेर तहसीलदार रमेश मुंडलोड यांच्या आदेशावरून अव्वल कारकून रमेश तांबे यांनी बुधवारी (4 ऑक्टोबर) रोजी सिटीचौक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


या कर्मचाऱ्यांवर झाला गुन्हा दाखल


मुख्याद्यापक मिसाळ एस.जी., सहशिक्षिका श्वेता रमाकांत साबळे, गजानन बहुउद्देशीय शाळा गारखेडा, गारखेडा माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालय गारखेडाच्या मुख्याद्यापिका श्रीमती देशमुख, शिक्षक शेख एस. ए. जाधव एस.डी., डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. भगवान साखळे, कर्मचारी आ. टी. साबळे, मनपा शाळा नारेगावच्या मुख्याद्यापिका श्रीमती ताज, सहशिक्षक कि. दौ. बावस्कर, कैलास टेकाळे.


कार्यालयप्रमुखांवरही गुन्हे दाखल...


भारत निवडणूक आयोगाकडून विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 2023 राबवण्याबाबतच्या सूचना आहेत. त्यानुसार घरोघरी जाऊन मतदारांचे सर्व्हेक्षण करण्याचे निर्देश प्राप्त झाले आहेत. मतदार नोंदणी अधिकारी म्हणून शिक्षक, कर्मचारी यांनी त्यांचे शासकीय काम सांभाळून उर्वरित वेळेत घरोघरी जाऊन ज्या मतदारांचे वय 80 वर्षपेक्षा जास्त आहे त्यांची भेट घेणे. तसेच मयत, स्थलांतरीत, नव मतदार यांची माहिती भरण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु काही शाळा तसेच कार्यालयांनी या कर्मचाऱ्यांना वारंवार नोटिसा देऊन देखील हेतूपुरस्कर कार्यमुक्त केले नाही. अशा बीएलओ तसेच संबंधित कार्यालय प्रमुख व इतर यांच्यावर तहसिलदार महसूल तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी 109 पूर्व श्रीमती पल्लवी लिंगदे यांनी सिटी चौक पोलीस स्टेशन येथे जाऊन गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयाने दिली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


मोठी बातमी! समृद्धी महामार्ग 5 दिवसांसाठी बंद राहणार, असा असेल पर्यायी मार्ग