छत्रपती संभाजीनगर : बीड बायपास परिसरात गुरुवारी सायंकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेत 20 वर्षीय तरुणीचा जिममध्ये व्यायाम करताना मृत्यू झाला. अचानक चक्कर येऊन कोसळलेल्या या तरुणीला तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने (Heart attack) तिचा मृत्यू झाला. एकुलती एक मुलगी गमावल्याने कुटुंबावर शोककळा पसरली. (Chhatrapati Sambhajinagar News)

Continues below advertisement


मृत तरुणीचे नाव प्रियांका अनिल खरात (वय 20, रा. बीड बायपास) असे आहे. प्रियंका बीफार्मसीपर्यंत शिक्षण पूर्ण करून पुढील शिक्षणाची तयारी करत होती. तिचे वडील अनिल खरात हे देवगाव रंगारी येथे पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. कुटुंब बीड बायपास परिसरातील मस्के पेट्रोल पंपाजवळील अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास आहे.


गुरुवारी संध्याकाळी आई बाहेर गेल्याने प्रियांकाने वडिलांना चहा करून दिला. त्यानंतर नेहमीप्रमाणे ती जिमला जाण्यासाठी घरातून निघाली. तिच्यासोबत भाऊ यश आणि मैत्रीण प्रणाली कुलकर्णी होती. तिघेही हसतखेळत जिममध्ये पोहोचले. काही वेळ व्यायाम केल्यानंतर प्रियांका भावाची वाट बघत असताना अचानक कोसळली. तिला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाला. सायंकाळी गादिया विहार स्मशानभूमीत प्रियांकावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.


प्रियांका आणि तिचा धाकटा भाऊ यश यांचे नाते अगदी घट्ट होते. दोघेही कायम एकमेकांच्या सोबत असत. घरातील कामे असो किंवा फेरफटका, जिमला जाणे असो, ते एकत्रच करीत. बहिणीच्या अचानक झालेल्या मृत्यूने यश कोसळला असून, आता पुढच्या आयुष्यात बहिण नसणार असे म्हणत त्याने आक्रोश केला.