Kalyan Kale On Haribhau Bagde : माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे (Haribhau Bagde) यांच्यावर काँग्रेस नेत्याकडून गंभीर आरोप करण्यात आले आहे. साधी मोटारसायकलही नसलेल्या बागडेंकडे कोट्यवधींची संपत्ती कोठून आली, त्यामुळे त्यांची 'ईडी' (ED) चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे माजी आमदार कल्याणराव काळे (Kalyan Kale) यांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या मतदार संपर्क अभियानानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषेदत बोलताना कल्याण काळे यांनी बागडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
माझ्या बापाने मी आमदार होण्यापूर्वीच मला बंगला बांधून दिला होता. तर पूर्वीपासूनच मी चारचाकी गाडीत फिरतो. मात्र भाजप आमदार हरिभाऊ बागडे आमदार झाले त्यावेळी त्यांच्याकडे साधी दुचाकी नव्हती. पण आज संभाजीराजेसारखा साखर कारखाना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात चार बंगले आहेत. सोबतच पुणे आणि मुंबईतील बंगल्यासह बागडेंकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. बागडे यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती कोठून आली. त्यामुळे ईडीला चौकशी करायची असेल तर त्यांनी हरिभाऊ बागडेंची करायला हवी, अशी मागणी काळे यांनी केली आहे. त्यामुळे आता काळे यांच्या आरोपाला बागडे काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
हरिभाऊ बागडेंनी राजीनामा द्यावा
गेल्या आठवड्यात विहिरीच्या फाईल मंजूर होत नसल्याने हरिभाऊ बागडे यांनी पंचायत समितीमध्ये आठ तास ठिय्या मांडून आंदोलन केले होते. दरम्यान यावरुनच काळे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. एका विधानसभेच्या माजी अध्यक्षाला आणि सत्तधारी पक्षाच्या आमदाराला जर विहिरीच्या फायलींसाठी आठ तास पंचायत समितीत बसावे लागले. त्यामुळे या सरकारचा प्रशासनावर अंकुश राहिलेला नसल्याचे दिसून येत आहे. चार वर्षात 700 विहिरीच्या फायली पेंडिंग ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे हरिभाऊ बागडे यांनी राजीनामा द्यावा, असे कल्याणराव काळे म्हणाले.
विधानसभा निवडणुकीपूर्वीच आरोप-प्रत्यारोप...
विधानसभा निवडणुकीत फुलंब्री मतदारसंघातून हरिभाऊ बागडे विरुद्ध कल्याण काळे असा सामना प्रत्येक वेळी पाहायला मिळतो. 2019 मध्ये देखील असा सामना रंगला होता. मात्र बागडेंनी काळेंचा पराभव केला. आता 2024 मध्ये देखील हे दोन्ही नेते एकमेकांच्या विरोधात रिंगणात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वीच दोन्ही नेत्यांकडून एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच आता काळे यांनी बागडे यांच्या ईडी चौकशीची मागणी केली आहे. तर काळे यांच्या आरोपाला बागडे यांच्याकडून काय उत्तर मिळणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: