Chhatrapati Sambhaji Nagar News : बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या दोघांचा पाझर तलावात पोहत असताना बुडून मृत्यू झाल्याची घटना छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात समोर आली आहे. वैजापूर तालुक्यातील डवाळा शिवारात रविवारी (25 जून) दुपारी ही घटना घडली. ज्यात शाहेद इरफान सय्यद (वय 18 वर्षे) आणि आयुष संतोष पडवळ (वय 15 वर्षे, दोघे रा. डवाळा, ता. वैजापूर) असे पाण्यात बुडून मृत पावलेल्या मुलांची नावं आहेत.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डवाळा येथील शाहेद आणि आयुष हे शेजारी राहतात. शाहेद हा संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असून तो कोपरगावमध्येच राहतो. शनिवार आणि रविवारी तो घरी येत असतो. दरम्यान रविवारी दुपारी चारच्या सुमारास आयुष आणि शाहेद बकऱ्या चारण्यासाठी गावालगतच्या पाझर तलावाजवळ गेले होते. त्यावेळी ते दोघे पोहण्यासाठी तलावात उतरले होते. नेहमीच्या ठिकाणाहून 10 ते 15 फूट अंतर दूर गेल्यावर दोघेही पाण्यात बुडाले. 


तलावात पोहण्यासाठी गेलेले शाहेद आणि आयुष दोघेही पाण्यात बुडाल्याचे अन्य युवकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा सुरु केला. याची माहिती गावात मिळताच ग्रामस्थांनी धाव घेतली. तर याबाबत पोलिसांना देखील माहिती देण्यात आली. माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक राम घाडगे आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर शोधकार्य करण्यात आले. दरम्यान पोहण्यात तरबेज असलेल्यांनी तलावात उडी मारुन शोध सुरु केला. त्यात सुरुवातीला शाहेद सापडला. तासाभराच्या शोधकार्यानंतर आयुष आढळून आला. या दोघांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी वैजापूर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


मुरुम आणि मातीचा उपसा झाल्याने खड्डे 


यातील आयुष हा इयत्ता आठवीत असून तो गावातीलच मुक्तानंद विद्यालयात शिकत आहे. तर शाहेद हा कोपरगाव येथे संजवनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. हे दोघे ज्या ठिकाणी पोहण्यासाठी गेले तिथून समृद्धी महामार्गाच्या कामासाठी मुरुम व मातीचा उपसा झालेला असल्याने तेथे खड्डे झालेले आहेत. या खड्ड्यात बुडून त्या दोघांचा जीव गेल्याने संताप व्यक्त होत आहे.


गावात शोकाकुल वातावरण...


शाहेद आणि आयुष हे शेजारी राहतात, त्यामुळे दोघेही चांगले मित्र आहेत. शिक्षणासाठी शाहेद हा कोपरगावमध्ये राहत असून, शनिवार आणि रविवारी घरी येत होता. दरम्यान रविवारी तो आयुषसोबत पोहण्यासाठी तलावात गेला आणि दोघेही पाण्यात बुडाले. दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती गावात कळताच गावात शोकाकूल वातावरण पाहायला मिळाले. तर अनेकांनी या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली. शाहेद आणि आयुष या दोघांच्या कुटुंबाला या घटनेने मोठा धक्का बसला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


मान्सून आला रे..! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी