Chhatrapati Sambhaji Nagar Rain Update : जून महिला उलटल्यानंतर किमान जुलै महिन्यात तरी जोरदार पाऊस (Rain) पडेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना असताना, पहिला आठवडा कोरडाच गेला. मात्र मंगळवारी छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) काही भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. वैजापूर तालुक्यातील संजरपूरवाडी आणि करंजगाव शिवारात ढगफुटीसदृश्य पाऊस मंगळवारी सायंकाळी पडला. त्यामुळे रात्रीतून विहिरीतील पाणी वाढले आहे. 


वैजापूरच्या तालुक्यातील विविध भागात मंगळवारी सायंकाळी झालेल्या पावसाने नदी-नाले तुडूंब भरून वाहत आहेत. तसेच शेती पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. शिऊर येथेही पहिल्यांदाच पावसाने तासभर हजेरी लावल्याने शेतकऱ्यांत समाधान आहे. संजरपूरवाडी शिवारात झालेल्या पावसामुळे काही घरे पाण्याखाली गेल्याची माहिती पुढे येत आहे. शेतातील नुकतेच पेरलेली पिकं मातीसह वाहून गेली आहेत. त्यामुळे पंचनामे करून तत्काळ सरकारने मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. तर सवदंगाव, नालेगाव, बोरसर, भिवगाव, खंडाळा परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. 


बाबरा परिसरात धुवांधार पाऊस 


फुलंब्री तालुक्यातील बाबरासह परिसरात मंगळवारी (4 जून) रोजी दोन वाजेच्या सुमारास धुवाधार पाऊस झाला. बाबरा, निधोना, सोनारी, वावना, चिंचोली, हिवरा, कान्हेगाव, बोधेगाव, बाभुळगाव, लिहाजाहागीर आदी गाव परिसरात पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी शेती बंधारे पाण्याने फुटून गेले. या पावसामुळे शेतकरी, शेतमजूर वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


सोयगाव तालुक्यात पावसाची हजेरी...


प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मंगळवारी जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, सोयगाव तालुक्यातील फर्दापूर परिसरातसुद्धा जोरदार पाऊस कोसळताना पाहायला मिळाला. मंगळवारी दुपारच्या सुमारास मेघगर्जनेसह सुरू झालेल्या पावसाने फर्दापूर परिसरात तासभर हजेरी लावली. त्यामुळे ओढ्यांना पूर आला होता. कोरड्या पडलेल्या नदी पात्रात पुन्हा एकदा पाणी वाहतांना दिसून आले. तसेच या पावसामुळे परिसरातील शेतकरी ही सुखावल्याचे दिसून आले आहे. सुमारे तासभर हा पाऊस परिसरात समाधानकारकरीत्या बरसला. महिनाभरापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे आनंद झाला आहे. 


शेतकऱ्यांना दिलासा मिळाला... 


गेल्या महिन्याभरापासून शेतकरी पावसाची वाट पाहत होता. तर पाऊस पडत नसल्याने पेरण्या देखील थांबल्या होत्या. तर जुलै महिन्याचा पहिला आठवडा देखील कोरडा गेल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र मंगळवारी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. काल झालेल्या पावसामुळे पेरण्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. तर ज्यांनी पेरणी केली होती त्यांच्यावरील दुबार पेरणीचे संकट मिटले आहे. त्यामुळे कालच्या पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या : 


Marathwada Rain : छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील 'या' जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी; पाहा कोणत्या जिल्ह्यात पावसाची हजेरी