Chhatrapati Sambhaji Nagar Crime News : गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात (Chhatrapati Sambhaji Nagar District) बायोडिझेल विक्रीचे प्रमाण वाढले आहेत. दरम्यान स्थानिक पोलिसांकडून याबाबत कारवाई अपेक्षित असताना, अशा बायोडिझेल विक्रीवर थेट छत्रपती संभाजीनगर विभागाच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाने कारवाई केली. पोलिसांनी केलेल्या या कारवाईने खळबळ उडाली आहे. शहराच्या बाहेर एका शिवारातील झुडपांमध्ये अवाढव्य टँकर लपवून दोघांकडून ही अवैधरीत्या बायोडिझेल विक्रीचा व्यवसाय सुरू होता. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या व्यवसायाची माहिती थेट विशेष पोलिस महानिरीक्षकांना मिळाल्यावर ही कारवाई झाली आहे. त्यामुळे स्थानिक पोलिसांना याबाबत कशी माहिती मिळाली नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मागील काही दिवसांत शहरातील अवैध व्यावसायिकांनी शहर व ग्रामीणच्या हद्दीवर त्यांचे गैरधंदे हलवल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान चिकलठाणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गांधेली शिवारात ट्रकचालकांना बायोडिझेल विक्री करण्यात येत असल्याची देखील काही दिवसांपासून चर्चा होती. दरम्यान याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांना मिळाली होती. त्यामुळे स्थानिक पोलिसांना बाजूला ठेवत चव्हाण यांनी विशेष पथकाला आदेश देऊन छापा टाकण्यास सांगितले. ज्यात वैजापूर येथे कार्यरत असलेल्या सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी यांना छाप्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे शुक्रवारी महक स्वामी गांधेली शिवारात आपल्या पथकासह छापा मारला. तर चार तास कारवाई करत पोलिसांनी या ठिकाणाहून 13 हजार 260 लिटर बायोडिझेल जप्त केले. तसेच या प्रकरणी आरिफउद्दिन खान खमरूद्दीन खान (रा. प्रगती कॉलनी, मकाई गेट) आणि फेरोज खान सिकंदर खान (रा. रशीदपुरा) यांना अटक करण्यात आली.
दिवसा टाक्या कापडाने झाकलेल्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरिफउद्दीनने हा व्यवसाय सुरु केला, तर फेरोज त्यास मदत करत होता. दिवसा टाक्यांवर कापड टाकून झाकून ठेवले जात होते. रात्री सर्रास विक्री सुरू होती. रात्री अकरा वाजता पथक घटनास्थळापासून काही अंतरावर उभे राहिले. वाहन लांब उभे करून आधी कर्मचाऱ्यांनी पायी जात खात्री केली. तेव्हाच एक ट्रक तेथे आला. त्यात दोघांनी बायोडिझेल भरण्यास सुरू करताच दबा धरुन बसलेल्या पथकाने छापा टाकला. यावेळी 20 हजार लिटर टँकरमध्ये 13 हजार लिटरचा साठा आढळून आला. ही कारवाई सहायक पोलिस अधीक्षक महक स्वामी यांच्यासह उपनिरीक्षक श्रीराम काळे,पोलिस नाईक आत्माराम पैठणकर, गोपाल जोनवाल, दिनेश गायकवाड, अमोल मोरे, योगेश कदम, राजाराम जगताप यांच्यासह रात्री अकरा वाजता छापा टाकला.
स्थानिक पोलिसांना कसे कळले नाही?
मागील काही दिवसांत शहरातील अवैध व्यावसायिकांनी आपले धंदे शहर व ग्रामीणच्या हद्दीवर हलवले आहेत. दरम्यान चिकलठाणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गांधेली शिवारात बायोडिझेल विक्रीचा व्यवसाय मागील अनेक दिवसांपासून सुरु होता. मात्र असे असताना स्थानिक चिकलठाणा पोलिसांना याची खबर कशी लागली नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे या कारवाईत पोलिस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी चिकलठाणा पोलिसांना बाजूला ठेवून थेट वैजापूरच्या अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले.
इतर महत्वाच्या बातम्या:
संभाजीनगरमधील उद्योजकांना अॅट्रॉसिटीच्या धमक्या देऊन खंडणी मागायचा; पोलिसांनी केलं तडीपार