Chhatrapati Sambhaji Nagar Crime : छत्रपती संभाजीनगरमधील (Chhatrapati Sambhaji Nagar) उद्योजकांच्या शासकीय कार्यालयात खोट्या तक्रारी करुन आणि अॅट्रॉसिटीच्या धमक्या देऊन खंडणी मागण्याच्या घटना गेल्या काही दिवसांपासून मोठ्याप्रमाणात वाढल्या असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. दरम्यान पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली असून, आता कारवाईला सुरुवात झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील एकाला पोलिसांनी तडीपार केले आहे. शासकीय कार्यालयात खोट्या तक्रारी करुन उद्योजकांना त्रास देणे आणि अॅट्रॉसिटीच्या धमक्या देऊन खंडणी मागत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. अशोक भाऊसाहेब वाहुळ (वय 30 वर्ष रा. सहारा कॉलनी सिडको महानगर 1 वाळूज) असे तडीपार करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस ठाणे एमआयडीसी वाळुज हद्दीत राहणारा अशोक भाऊसाहेब वाहुळ याच्याविरुद्ध 2022 ते 2023 या कालावधीत शेजाऱ्यांसोबत वाद घालून त्यांनी शिवीगाळ करुन मारहाण करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, एमआयडीसी वाळूज परिसरातील कारखानदारांच्या कंपनीत जाऊन त्यांच्या शासकीय कार्यालयाकडे खोट्या तक्रारी करुन त्यांना त्रास देणे, तसेच अॅट्रॉसिटीच्या नावाखाली खोट्या केसेस करण्याच्या धमक्या देऊन खंडणी वसूल करणे, असे गुन्हे दाखल आहेत. तसंच 2 दखलपात्र आणि 1 अदखपात्र गुन्ह्याची देखील नोंद आहे.
दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार
अशोक वाहुळच्या वाढत्या गुन्हेगारी वर्तनामुळे वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यातून सहाय्यक पोलीस आयुक्तांनी पोलीस उपायुक्त यांच्याकडे हद्दपार प्रस्ताव पाठवला होता. तर अशोक भाऊसाहेब वाहुळ याची वाळूज MIDC पोलीस ठाणे तसेच आजूबाजूच्या परिसरातील सर्वसामान्य नागरिक, कारखानदार, कामगार यांचे जीवितास आणि मालमत्तेस नजीकच्या काळात मोठ्या प्रमाणात भय, धोका, इजा निर्माण होऊन असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. तर भविष्यात त्याने गुन्हे आणि गैरकृत्य करु नये, गुन्हेगारी प्रवृत्तीस आळा बसावा, सर्वसामान्य नागरिकांच्या मालमत्तेचे रक्षण व्हावे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अबाधित राहावा म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 56 (अ) (ब) अन्वये विहीत केलेल्या अधिकाराचा वापर करुन पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे यांनी त्यास दोन (2) वर्षाकरीता संभाजीनगर शहर तसेच जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
कारखानदार आणि व्यवसायिकांकडे पैशांची मागणी
तर अशोक भाऊसाहेब वाहुळ हा अतिशय हिंस्त्र, भांडखोर, क्रूर स्वभाव तसेच बळाचा वापर करुन गुन्हे करण्याच्या प्रवृत्तीचा असल्याने त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्याला वेळोवेळी सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. तसेच त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई देखील केलेल्या आहेत. तरी देखील अशोक वाहुळच्या वर्तनात सुधारणा झालेली नाही. त्याने गुन्हेगारी कृत्ये चालूच ठेवले, सर्वसामान्य नागरिकांना साथीदाराचे मदतीने शिवीगाळ करुन लाठ्याकाठ्याने मारहाण करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, रस्त्यात अडवून अन्यायाची आगळीक करणे, वाळूज MIDC हद्दीतील कारखानदार आणि व्यावसायिकांना जीवे मारण्याच्या धमक्या देऊन पैशांची मागणी करणे, अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
धक्कादायक! संभाजीनगरचे स्वयंघोषित नेते करतायत उद्योजकांना ब्लॅकमेल