Chhatrapati Sambhaji Nagar Crime News: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील (Chhatrapati Sambhaji Nagar District) कचनेर परिसरात एक दुर्दैवी घटना समोर आली असून, तोल गेल्याने शेततळ्यात पडून ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू (Death) झाला आहे. स्वतः च्या शेतातील शेततळ्यावर विद्युत मोटार लावत असताना तोल जाऊन शेततळ्यात पडल्याने बुडून ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना कचनेर येथे सोमवारी सायंकाळी घडली आहे. हरिभाऊ विनायक भानुसे (वय 39 वर्षे) असे मयत ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कचनेर येथील शेतकरी असलेले आणि गावातील ग्रामपंचायतचे सदस्य असलेले हरिभाऊ भानुसे हे सोमवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास स्वतःच्या शेतातील शेततळ्यातून पिकांना पाणी देण्यासाठी विद्युत मोटार लावत होते. मात्र अचानक त्यांचा तोल जाऊन ते शेततळ्यात पडले. यावेळी आसपास कोणीही नव्हते. तसेच त्यांना पोहता येत नसल्यामुळे त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
शेततळ्याल आढळून आला मृतदेह...
दरम्यान शेतात गेलेले हरिभाऊ भानुसे रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरू केला. बराच शोध घेऊन देखील भानुसे सापडले नाही. दरम्यान त्यांचा शोध घेत असताना शेतातील शेततळ्याजवळ हरिभाऊ यांची चप्पल आणि मोबाइल आढळून आला. त्यामुळे गावकऱ्यांच्या मदतीने शेततळ्याला त्यांचा शोध घेण्यात आला असता पाण्यात त्यांचा मृतदेह सापडला. नागरिकांनी मृतदेह पाण्याबाहेर काढून शासकीय घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला. याप्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक फौजदार ज्ञानेश्वर करंगळे हे करीत आहेत.
तरुणाची गोदावरी नदीच्या पात्रात उडी घेऊन आत्महत्या
दरम्यान दुसऱ्या एका घटनेत नैराश्य आणि आजारपणाला कंटाळून एका युवकाने जुने कायगाव येथील गोदावरी नदीच्या पात्रात उडी मारून जीवनयात्रा संपवली. किशोर हरिचंद्र पवार (वय 27 वर्षे, रा. खंडाळा, ता. वैजापूर) असे मयत युवकाचे नाव आहे. मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास मासेमारी करणाऱ्या स्थानिक मच्छिमारांच्या जाळ्यात किशोर पवारचा मृतदेह सापडला. याबाबत त्यांनी तात्काळ गंगापूर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक बचाव पथकाच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला. गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला. मयत किशोरच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.
तर सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास किशोर दुचाकी घेऊन जुने कायगावला आला असावा, आणि येथील नवीन पुलावर दुचाकी लावून रात्री साडेनऊच्या सुमारास त्याने नदीपात्रात उडी घेऊन जीवनयात्रा संपविली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. याबाबत गंगापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय पाखरे हे करीत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या :