Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) जागावाटपाचा (Seat Sharing) तिढा कायम असतानाच, छत्रपती संभाजीनगर लोकसभेची (Chhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha) जागा आता ठाकरे गटाकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचं कारण म्हणजे लोकसभा निवडणूकीचं छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरे गटाच्या प्रचार कार्यालयाचे उद्या उद्घाटन होणार आहे. उद्या सकाळी 10 वाजता हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. महाविकास आघाडीत अजूनही जागावाटपाचा निर्णय झाला नाही, मात्र ज्याप्रमाणे ठाकरे गटाकडून उद्यापासून प्रचार कार्यालयाचे काम सुरु केले जात आहे, त्यानुसार संभाजीनगरची जागा ठाकरे गटाकडे राहणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. 


ठाकरे गटाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, “उद्या दिनांक 13 मार्च 2024 वार बुधवार रोजी सकाळी 10 वाजता शहरातील समर्थनगर येथे छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणूक निमित्त शिवसेना प्रचार कार्यालयाचे स्तंभ पूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर या प्रचार कार्यालयाचे काम सुरु होणार आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी हा कार्यालय उभारला जाणार आहे, त्याच ठिकाणी दरवेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे लोकसभा निवडणुकीचं प्रचार कार्यालय पाहायला मिळते. त्यामुळे उमेदवारी देखील खैरे यांना फायनल झाली असल्याची चर्चा आहे. 


संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत ठाकरे गटाकडेच राहणार 


मागील काही वर्षांपासून शिवसेनेची संभाजीनगरमध्ये सत्ता पाहायला मिळते. तसेच, संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ देखील अनेक वर्षांपासून चंद्रकांत खैरे यांच्या रूपाने शिवसेनेच्या ताब्यात राहिला आहे. मागच्यावेळी मराठा आरक्षणाचा मुद्दा तापल्याने याचा फटका खैरे यांना बसला होता. त्यामुळे एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी बाजी मारत विजय मिळवला. मात्र, यंदा शरद पवार गट, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र लोकसभा निवडणूक लढणार आहे. त्यामुळे हा मतदारसंघ ठाकरे गटाकडे जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, आता प्रत्यक्षात छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत ठाकरे गटाकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 


महायुतीत संभाजीनगरची जागा कुणाला मिळणार?


एकीकडे ठाकरे गट उद्यापासून प्रचार कार्यालयाच्या कामाला सुरवात करत आहेत, तर दुसरीकडे महायुतीत मात्र हा मतदारसंघ कुणाकडे जाणार याबाबत निर्णय होऊ शकलेला नाही. भाजप-शिवसेना युतीत हा मतदारसंघ नेहमी शिवसेनेकडे राहिला असल्याने तो आम्हालाच द्यावा असा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. मात्र, शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे सेनेची ताकद कमी झाली असून, भाजपचा उमेदवार येथून विजयी होऊ शकतो असा दावा भाजपचे नेते करत आहेत. विशेष म्हणजे मागच्या आठवड्यात स्वतः अमित शाह यांनी हा मतदारसंघ भाजप लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता शिंदे गट की भाजप कुणाला संभाजीनगरची जागा मिळते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


खाण की बाण, मराठा आरक्षण, नामांतरासह पाणी प्रश्नावरून गाजणार छत्रपती संभाजीनगरची लोकसभा निवडणूक; कुणाला कोणत्या पक्षातून मिळणार उमेदवारी?