Two Deputy Sarpanch Demand : राष्ट्रवादी पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर अजित पवार यांच्यासह एकूण 9 जणांची मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. दरम्यान यावेळी अजित पवार यांना उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) करण्यात आल्याने आता राज्यात दोन उपमुख्यमंत्री झाले आहे. दरम्यान याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्यातील एका माजी सरपंचाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे अजब मागणी केली आहे. ज्याप्रमाणे राज्यात दोन उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील गावांच्या विकासासाठी दोन उपसरपंच निवड पद्धत लागू करण्याची मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे. वैजापुर तालुक्यातील मनूर येथील माजी सरपंच राजीव सुदामराव साळुंके यांनी ही मागणी केली आहे. 


राजीव साळुंके यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "जसे महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आपण मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्र्यांची निवड करू शकता, त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील प्रत्येक गावाच्या विकासासाठी प्रत्येक गावात दोन उपसरपंच निवडीची परवानगी द्यावी. गावाच्या विकासासाठी सरपंचाला समर्थन देण्यासाठी व त्यांच्याकडून गावाचे काम करून घेण्यासाठी उपसरपंच हा महत्त्वाचा असतो. आपण केलेल्या उपमुख्यमंत्र्यांच्या निवडीच्या धर्तीवर आता गावाच्या भल्यासाठी दोन उपसरपंच निवड करता यावी. त्यामुळे यावर सकारात्मक चर्चा करून, कॅबिनेटमध्ये याबाबत निर्णय घेण्यात यावा अशी विनंती यावेळी निवेदनात करण्यात आली आहे.




राज्यात ज्याप्रमाणे दोन उपमुख्यमंत्री आहेत त्याचप्रमाणे प्रत्येक गावात दोन उपसरपंच पदाची पद्धत लागू करण्याची मागणी छत्रपती संभाजीनगरचे माजी सरपंच राजीव सुदामराव साळुंके यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. विशेष म्हणजे या मागणीचे निवदेन देखील त्यांनी ई-मेल द्वारे मुख्यमंत्री शिंदे यांना पाठवला आहे. तर मुख्यमंत्री कार्यालयाकडुन त्यांना उत्तर आले असून, सदर मागणी ही ग्रामविकास विभागाकडे वर्ग करण्यात आल्याचा मेल त्यांना मिळाला आहे. त्यामुळे आता त्यांच्या मागणीवर ग्रामविकास विभाग काय निर्णय घेणार हे पाहणे देखील महत्त्वाचे असणार आहे. मात्र या अजब मागणीची परिसरात जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. 


असा आहे उपमुख्यमंत्रीपदाचा इतिहास


देशातील अनेक राज्यात दोन उपमुख्यमंत्री असल्याचे उदाहरण आहे. मात्र याचा एक इतिहास देखील आहे. मुळात देशाच्या संविधानात उपमुख्यमंत्रीपदाबाबत कोणताही स्पष्ट असा उल्लेख करण्यात आलेला नाही. मात्र सत्तधारी पक्षातील किंवा आघाडीतील वाद मिटवण्यासाठी, नेत्याला संतुष्ट करण्यासाठी उपमुख्यमंत्रीपद एक एवजी दोन दिले जातात.  बिहारमधील अनुग्रह नारायण सिन्हा यांची भारतातील पहिले उपमुख्यमंत्री म्हणून नोंद करण्यात आलेली आहे. रजपूत समाजातून येणारे सिन्हा बिहारमधील काँग्रेसचे एक प्रमुख नेते समजले जात होते. 1967 नंतर काँग्रेसची एकहाती वर्चस्व कमी होत असल्याने अनेक राज्यांमध्ये उपमुख्यमंत्रीपद देण्यात येत होते. त्यातच याचे पहिले बहुमान सिन्हा यांना मिळाले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


मोठी बातमी! शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता बीआरएस पक्षात फुट पडण्याची शक्यता; 'या' नेत्याने दिला थेटच इशारा