Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhaji Nagar) मोठी बातमी येत असून, शहरातील सिडको चौकात गॅसचा टँकर उलटल्याने खळबळ उडाली आहे. सिडको पुलाच्या कठड्याला टँकरचा वॉल धडकल्याने हा अपघात झाला असून, टँकरमधून गॅस लिक होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसरातील सर्व रस्ते बंद केले आहेत. सोबतच अग्निशमन दलाचे  तीन ते चार बंब देखील दाखल झाले आहेत. 


दरम्यान, या अपघातानंतर छत्रपती संभाजीनगर वासियांना प्रशासनाकडून महत्वाचे आवाहन करण्यात आले आहेत. ज्यात, "जालना रोडवर एन-3 परिसरात गॅस टँकर उलटला असून, त्यातून गॅस गळती होत आहे. त्यामुळे जालना रोडवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. जालना रोडवर जाऊ नका आणि पर्यायी वाहतूक मार्गाचा वापर करा. तसेच, सिडको परिसरात नागरिकांनी घरातील गॅस पेटवू नये. ज्वलनशील वस्तूंचा वापर टाळावा, असे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आले आहेत. 


जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आवाहन...


तसेच, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देखील तातडीचा मॅसेज देण्यात आला आहे. ज्यात म्हटले आहे की, 'एन-3 परिसरात गॅस टँकर उलटला असून, त्यातुन गॅस गळती होत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सिडको परिसरातील नागरिकांनी घरातील गॅस पेटवू नये. घरात ज्वलनशील वस्तूचा वापर करू नये. शहरातील नागरिकांनी जालना रोड सिडको परिसरात वाहने नेऊ नये. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाना सहकार्य करावे, असे म्हटले आहे.


घटनास्थळी पोलीसांचा मोठा बंदोबस्त...


सिडको चौकात गॅसची वाहतूक करणारा टँकरचा अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, गॅस लिक होत असल्याने परिसरातील रस्ते बंद करून वाहतूक रोखणे महत्वाचे असल्याने पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या परिसरात सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले असून, वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. तर, स्वतः वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले असून, परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. 


कुलिंगचे काम सुरु


दरम्यान याबाबत माहिती देतांना अग्निशमन दलाचे अधिकारी शिवाजी झनजन म्हणाले की, पहाटे 5 वाजून 18 मिनिटांनी कॉल आला होता. घटनास्थळी आमच्या तात्काळ तीन गाड्या दाखल झाल्या. टँकरमधील चालकाला आमच्या टीमने बाहेर काढले.  गॅस मोठ्या प्रमाणात लिक होत असल्याने वाहतूक बंद करणे गरजेचं होतं. त्यामुळे याची माहिती पोलिसांना दिली. सोबतच महावितरण विभागाला माहिती देऊन या परिसरातील वीज बंद केली. हा गॅस हवेपेक्षा अधिक जड असल्याने तो जमिनीवरच पसरणार आहे. सध्या कुलिंगचे काम सुरु आहे. अजूनही मोठा धोका आहे, जोपर्यंत टँकरमधील संपूर्ण गॅस खाली होत नाही तोपर्यंत धोका आहे. त्यामुळे अजून साडेपाच तास हा गॅस बाहेर पडण्यासाठी लागणार असल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. 


इतर महत्वाच्या बतम्या: 


मोठी बातमी! जायकवाडीतील पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव; मराठवाड्यावर दुष्काळाचं सावट