Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर शहरात पुन्हा एकदा पेट्रोल पंपावर तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. 10 जानेवारीपासून पुन्हा एकदा ट्रक चालक संपावर (Truck Drivers Strike) जाणार असल्याची अफवा पसरली असून, त्यामुळे दुचाकी आणि चारचाकी चालक आपल्या गाड्यांचे टॅंक फुल करून घेत आहेत. त्यामुळे शहर आणि ग्रामीण भागातील अनेक पेट्रोल पंपावर आता गर्दी होतांना पाहायला मिळत आहे. मात्र, अद्याप तरी आपल्याला ट्रक चालकांकडून संपाबाबत कुठलीही सूचना मिळाली नसल्याचं पेट्रोल पंप असोसिएशनचे अखिल अब्बास यांनी म्हटले आहे. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून गर्दी करू नयेत असे देखील त्यांच्याकडून आवाहन करण्यात आले आहेत. 


आज सकाळपासून सोशल मीडियावर एक फोटो आणि दोन ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. त्यामधील एक ऑडिओ क्लिपमधील दोन लोकांचे संभाषण असून, त्यात 10 जानेवारीपासून पुन्हा एकदा संपावर जाण्याचा दावा केला जात आहे. नवीन वाहन कायदा रद्द होत नाही तोपर्यंत हा संप चालू राहणार असल्याचा यात दावा केला जात आहे. याच ऑडीओ क्लिपमुळे नागरिक पुन्हा एकदा इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गर्दी करत आहेत. विशेष म्हणजे ही ऑडिओ क्लिप कधीची आहे, कुणाची आहे, त्यात कितपत तथ्य आहे याची कोणतेही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, ट्रक चालक पुन्हा संपावर जात असल्याच्या अफवांमुळे नागरिक पुन्हा एकदा पेट्रोल पंपावर गर्दी करत असल्याचे चित्र आहे. 


गेल्या आठवड्यात ट्रक चालक आणि इंधन टँकर वाहक चालक यांनी पुकारलेल्या संपानंतर राज्यभरात इंधन टंचाई निर्माण झाली होती. राज्यातील अनेक भागात इंधन संपल्याने अक्षरशः पेट्रोल पंप बंद ठेवण्याची वेळ आली होती. अशीच काही परिस्थिती छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यात पाहायला मिळाली. विशेष म्हणजे याचे परिणाम संप संपल्यानंतर देखील पाहायला मिळाले. ट्रक चालकांनी संप मागे घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील अनेक ठिकाणी इंधन उपलब्ध नव्हते. दोन-तीन दिवसात सर्व परिस्थिती सुरळीत सुरू झाली असतानाच, आता पुन्हा एकदा ट्रक चालकांच्या संपाची अफवा पसरली आहे. त्यामुळे नागरिक आपल्या वाहनांमध्ये पेट्रोल-डिझेल भरून ठेवण्यासाठी गर्दी करताना पाहायला मिळत आहे. 


अफवांवर विश्वास ठेवू नका...


दरम्यान, या सगळ्या परिस्थितीवर पेट्रोल पंप असोसिएशनचे अखील अब्बास यांनी प्रतिक्रिया दिली आहे."10 जानेवारी पासून पेट्रोल-डिझेल टँकर चालक संपावर जात असल्याचे काही मेसेज व्हायरल झाले आहे. मात्र, प्रत्यक्षात आमच्या पेट्रोल पंपाचे ट्रक चालकांकडून अशा कोणत्याही संपाची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी पेट्रोल पंपावर जाऊन गर्दी करू नयेत. त्यांच्या याच गर्दीमुळे आणखी अफवा पसरत आहे. तसेच, नागरिकांना पेट्रोल-डिझेलची टंचाई जाणवू नयेत यासाठी आम्ही सर्वच पेट्रोल पंप चालक प्रयत्न करत आहोत. मात्र, यासाठी नागरिकांची साथ हवी आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून पेट्रोल पंपावर गर्दी करू नयेत,” असे अखिल अब्बास म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या: 


जमीन गैरव्यवहारावरून संभाजीनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक गाजली; दानवे, जलील, बागडे आक्रमक