छत्रपती संभाजीनगर : जिल्हा नियोजनाची आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली असून, आजची ही बैठक वादळी ठरणार असल्याची चर्चा आहे. कारण, गेल्यावेळी झालेल्या  जिल्हा नियोजन बैठकीत प्रचंड राडा पाहायला मिळाला होता. पालकमंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्यात वाद झाला होता. तर, दानवे हे थेट भुमरे यांच्या अंगावर धावून गेले होते. त्यामुळे आजच्या संभाजीनगर जिल्हा नियोजन बैठकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. 


निधी वाटपावरून लोकप्रतिनिधींमध्ये यापूर्वी देखील अनेकदा आरोप- प्रत्यारोप झाले आहेत. तर, आतापर्यंत 500 कोटींपैकी केवळ 150 कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहेत. उर्वरित 350 कोटींच्या प्रशासकीय मान्यता शिल्लक असून, यावर आजच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. विशेष लोकसभा निवडणुका काही महिन्यावर आल्या असल्याने  मार्च महिन्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. अशात आजची शेवटची बैठकही ठरणार आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत प्रशासकीय मान्यतेवरूनच पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींमध्ये आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी खबरदारी म्हणून बैठकीच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या प्रमुख उपस्थित जिल्हा नियोजनची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात होणार असून, यासाठी जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी उपस्थित असणार आहे. 


गेटवर प्रत्येकाची तपासणी...


जिल्हा नियोजनाची आजची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, बैठकीपूर्वी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी तैनात असल्याचे चित्र आहे. तर, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर पोलिसांकडून आतमध्ये जाणाऱ्या प्रत्येकाची तपासणी केली जात आहे. तसेच शासकीय कर्मचारी यांचे ओळखपत्र पाहून आतमध्ये सोडले जात आहे. सोबतच बैठकीसंबंधी असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांची एक यादी तयार करण्यात आली असून, यादीमध्ये नाव असलेल्या लोकांनाच आतमध्ये सोडण्यात येत आहे. तर, मी पहिल्यांदाच जिल्हा नियोजनाच्या बैठकीला एवढा पोलीस बंदोबस्त पाहत असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहेत. तसेच, एवढ्या पोलिसांची गरज नव्हती असे आमदार संजय शिरसाट म्हणाले आहेत. 


आजची जिल्हा नियोजन बैठक महत्वाची


आगामी लोकसभा-विधानसभा निवडणूक लक्षात घेता सर्वच लोकप्रतिनिधी यांना आपल्या मतदारसंघातील कामांना मंजुरी मिळावी अशी अपेक्षा असते. विशेष म्हणजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी जिल्हा वार्षीय योजनेत मोठी वाढ करण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे आजची जिल्हा नियोजन बैठक महत्वाची समजली जात आहे. 


संबंधित बातमी: 


मोठी बातमी! औरंगाबादच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राडा; मंत्री भुमरे-अंबादास दानवेंमध्ये थेट हमरीतुमरी