Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, आयकर अधिकारी असल्याचे सांगून सातत्याने फोन करणाऱ्या एका तोतया महिला आयकर अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामीण पोलिसांच्या पाचोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचोड परिसरातील विहामांडवा येथील एका व्यापाऱ्याला ही  तोतया महिला आयकर अधिकारी फोनवरून त्रास देत होती. त्यामुळे मंगळवारी सायंकाळी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्धमान पुनमचंद काला (वय 60 वर्षे, रा. विहामांडवा) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विहामांडवा येथील व्यापारी वर्धमान काला यांचे गावात वर्धमान हार्डवेअर नावाचे दुकान आहे. दरम्यान 7 मे रोजी दुपारी 1  वाजेच्या सुमारास त्यांना एका मोबाईल क्रमांकावरून महिलेचं फोन आला. आपण आयकर विभागात अधिकारी असून तुमचा मुलगा चार दिवसापासून घरी नाही. तुम्ही दोघे एकाच ठिकाणी पाहिजेत आम्हाला, आमची टीम तुमच्यावर वॉच ठेवून असल्याचं महिला म्हणाली. त्यानंतर देखील अनेकदा फोन आले. ज्यात आमची टीम तुमच्या व्यवसायावर वॉच ठेवून आहे. तुमची फाईल काढलेली आहे, आम्हाला जे पाहिजे ते आता आमच्याकडे आहे. तर आम्ही छापा मारण्यासाठी येत असल्याचं महिला म्हणाली. 


दरम्यान यामुळे महिलेला घाबरून वर्धमान काला तीला म्हणाले की, आमचे सगळे रेकॉर्ड व्यवस्थित आहेत. आम्ही वेळेवर इन्कम टॅक्स व जीएसटी भरतो. आम्ही काहीही लपवत नाही. तरी तुम्ही आम्हाला यामध्ये मदत करा. त्यावर सदर महिलेने आम्हाला तुम्ही ऑफिसला भेटायला या असे सांगितले. तसेच नाशिकला आमचे ऑफिस असल्याचे देखील सांगितले. मात्र वर्धमान काला यांना संशय आल्याने त्यांनी थेट पोचोड पोलीस स्टेशन गाठत पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली असता,  तोतया महिला आयकर अधिकारी असल्याचं समोर आले. त्यानुसार पोलिसांनी काला यांच्या जबाबानुसार गुन्हा दाखल केला आहे. 


यामुळे आला संशय... 


महिलेच्या बोलण्यावरून वर्धमान काला यांना सुरुवातीला कोणीतरी महिला अधिकारी बोलत असल्याचं वाटले. त्यामुळे ते घाबरून गेले होते. मात्र याचवेळी फोनवरून बोलणाऱ्या महिलेने नंतर काला हे घरातील आणि कोणत्या नातेवाईकांना फोनवर बोलतात याबाबत सांगितले. त्यामुळे काला यांना संशय आला. आपल्या घरातील गोष्टी किंवा आपण फोनवर कोणाशी बोलतो याबाबत अधिकाऱ्याला माहित असण्याचे काहीच कारण नसल्याचं त्यांच्या लक्षात आले. तसेच त्यांच्या मुलगा देखील कोणताही व्यवसाय करत नसल्याने मुलगा व ते एकाच ठिकाणी येण्याचा संबंधच येत नाही. त्यामुळे कोणीतरी तोतया महिला अधिकारी आपल्याला फोन करत असल्याचे त्यांचे लक्षात आले आणि त्यांनी पोलिसात धाव घेतली.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Chhatrapati Sambhaji Nagar Crime : पती-पत्नी चालवायचे लॉजमध्ये कुंटणखाना, पोलिसांनी डमी ग्राहक पाठवला अन् भांडाफोड झाला