बीड : बीडमधील (Beed) हिंसाचार हे मोठं षडयंत्री असून त्याची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी शासनाकडे करणार असल्याचं बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी म्हटलं. बीडमधील घटनेचा त्यांनी तीव्र निषेध देखील व्यक्त केला. अर्थाचा अनर्थ काढून जिल्हा पेटविण्याचा प्रयत्न समाजकंटकांनी केला असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी यावेळी केलाय. मराठा आरक्षणासाठी बीडमध्ये मोठ्या प्रमाणावर जाळापोळ झाली. त्या घटनेनंतर रविवार (6 नोव्हेंबर) रोजी धनंजय मुंडेंनी बीड जिल्ह्याची पाहणी केली.
बीडमध्ये हिंसाचार आणि जाळपोळ करणाऱ्या 144 आरोपींना अटक तर दोन हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर, पोलिसांकडून अन्य आरोपींचा शोध देखील सुरु आहे. या प्रकारनंतर पहिल्यांदाच धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले आणि ज्या ज्या ठिकाणी जाळपोळीचे प्रकार घडले होते त्याची पाहणी त्यांनी केली. बीड शहरातील शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष सचिन मुळूक यांच्या कार्यालयाला सुद्धा जमावाने आग लावली होती त्याच कार्यालयाची पाहणी धनंजय मुंडे यांनी सर्वप्रथम केली.
धनंजय मुंडे काय म्हणाले?
बीड शहराची पाहणी केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटलं की, बीडमध्ये ज्या पद्धतीने दुर्दैवी घटना घडल्या, तशा कधीच घडल्या नव्हत्या. अर्थाचा अनर्थ काढून जिल्हा पेटविण्याचा प्रयत्न समाजकंटकांनी केला. आतापर्यंत कधी कोणाच्या घरापर्यंत पोहचले नव्हते. त्यामुळे या घटनेचा तीव्र निषेध केला. जो घटनाक्रम, त्यावरून हे फार मोठे षडयंत्र असल्याचे स्पष्ट आहे. माजलगावात हिंसाचार रोखण्यासाठी पोलीस गेल्यानंतर बीड शहरात टार्गेट करुन दगडफेक, जाळपोळ झाली.
हजार पाचशे लोक पंधरा किलोमीटर जाऊन हॉटेल कसे जाळतात? असा सवाल देखील यावेळी धनंजय मुंडेंनी उपस्थित केला. पोलीस देखील हतबल झाल्याचे चित्र होते. या हिंसाचारातील प्रत्येकाला शिक्षा झाली पाहिजे. यासाठी या करणाची खोलात जाऊन चौकशी झाली पाहिजे, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाला बीड जिल्ह्यात 30 ऑक्टोबर रोजी हिंसक वळण लागले. आमदार प्रकाश सोळुंके आणि संदीप क्षीरसागर यांचे घर पेटवून देण्यात आले. सोबतच माजलगाव नगरपरिषदेच्या इमारतीलादेखील आग लावण्यात आली. 500 हून अधिक जणांची चौकशी या प्रकरणात पोलिसांनी केली आहे. तर 2 हजार जणांवर या प्रकरणी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे.
हेही वाचा :
Beed Maratha Protest : बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी जाळपोळ, आरोपींकडून 11 कोटी वसूल होणार