छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील आत्तापर्यंतचा सर्वात मोठा आणि राज्यभरात गाजलेल्या तीस-तीस घोटाळ्यातील आरोपी संतोष राठोडला जामीन मिळाला असून, या प्रकरणात त्याची निर्दोष सुटका देखील करण्यात आली आहे. मागील वर्षभरापासून तो हर्सूल कारागृहात होता. यापूर्वी देखील त्याने जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात याचिका केल्या होत्या, मात्र, त्याला जामीन मिळाला नव्हता. परंतु, आता राठोड याची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणात एकूण 27 साक्षीदार तपासण्यात आले. त्यानंतर दोन्ही बाजूचे साक्षी पुरावे तपासल्यावर न्यायालयाने राठोडची निर्दोष सुटका केली आहे. विशेष म्हणजे याच तीस-तीस घोटाळ्याची काही दिवसांपूर्वी ईडीने देखील माहिती मागवली होती. 


काय आहे तीस-तीस घोटाळा? 


छत्रपती संभाजीनगरच्या बिडकीन आणि परिसरातील डीएमआयसी प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करण्यात आल्या होत्या. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणावर मोबदला मिळाला होता. मात्र, याचवेळी संतोष राठोडने या शेतकऱ्यांना अधिकचा मोबदला देण्याचे आमिष दाखवल्याचे आरोप आहे. त्याच्या अमिषाला बळी पडून शेतकऱ्यांनी कोट्यावधी रुपये त्याच्याकडे गुंतवणूक केली. मात्र, पुढे राठोडने अचानक परतावा देण्यास बंद केले. एवढंच नाही तर मुद्दल पैसे देखील देण्यास टाळाटाळ करू लागला. त्यामुळे या प्रकरणात बिडकीन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी राठोड याला अटकही केली. धक्कादायक म्हणजे पोलिसांच्या तपासानंतर राठोडने संभाजीनगरसह अनेक जिल्ह्यातील लोकांकडून गुंतवणूकीच्या नावावर पैसे घेतल्याचे समोर आले. हा सर्व घोटाळा चारशे कोटींच्या घरात असल्याचे बोलले जाते. मात्र, आपल्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचं राठोड याचे म्हणणे होते. 


गोरगरिबांची फसवणूक केल्याचा आरोप...


बिडकीन परिसरात असलेल्या शेतकऱ्यांना डीएमआयसी प्रकल्पात जमिनी गेल्याने मोबदला मिळाला होता. यात अनेक गोरगरिब शेतकऱ्यांचा समावेश होता. मात्र, त्यांना अधिकचा मोबदला देतो म्हणून, तीस-तीस योजनेत पैसे गुंतवण्यासाठी राठोडने आमिष दाखवले. यासाठी नात्यागोत्यातील लोकांना एजंट म्हणून नेमण्यात आले. त्यांना देखील यासाठी कमिशन मिळत होते. राठोडसह त्याच्या एजंटने परिसरातील शेकडो लोकांचे पैसे या योजनेत गुंतवणूक केली. त्यांनतर मुद्दल आणि व्याज दोन्ही देण्यास नकार दिल्याचा आरोप आहे. 


पोलिसांसह नेत्यांची देखील नावं...


तीस-तीस योजनेत शेतकऱ्यांसह पोलीस आणि राजकीय नेत्यांनी देखील पैसे गुंतवणूक केल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. पोलिसांनी अटक केल्यावर संतोष राठोडकडे पोलिसांना एक डायरी सापडली होती. ज्यात महत्वाच्या लोकांकडून घेतलेल्या पैश्यांची नोंदी होत्या. याच डायरीत पोलीस अधिकारी, राजकीय नेते, आमदार, शिक्षक, हॉटेल चालक यासह अनेकांची नावं होती. त्यामुळे या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याचे समोर आले होते. 


संबंधित बातम्या: 


मोठी बातमी! राज्यभरात गाजलेल्या तीस-तीस घोटाळ्याची 'ईडी'ने मागवली माहिती