Aurangabad Bribe List : अनेकदा कारवाई होऊन देखील शासकीय यंत्रणांमधील लाचखोरी (Bribe) काही कमी होतांना दिसत नाही. त्यामुळे सतत एकमागून एक लाचखोरीच्या घटना उघडकीस येत आहे. दरम्यान, मागील काही वर्षात औरंगाबाद (Aurangabad) लाच लुचपत विभागाने धडक कारवाई करत अशा अनेक लाचखोरांना बेड्या ठोकल्या आहेत. विशेष, म्हणजे अनेकदा कारवाईनंतर लाखोंचा भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे अनेक लाचेच्या कारवाईत थेट लाखांची लाच मागण्यात आल्याचे देखील समोर आले आहेत.
औरंगाबाद शहर पोलीस दलातील जिन्सी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक असलेला अशफाक मुस्ताक शेख याच्यावर लाच मागितल्या प्रकरणी गेल्या महिन्यात कारवाई करण्यात आली होती. पोलीस ठाणे जीन्स येथील दाखल गुन्ह्यात साक्षीदार याला आरोपी न करण्यासाठी अशफाक यांनी 50 हजार रुपयांची पंचासमक्ष लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 30 हजार आणि गुन्ह्यातील पूर्वी अटक केलेल्या आरोपीकडे तीन लाखातील राहिलेले 1 लाख 10 हजार असे दोन्ही मिळून 1 लाख रुपये लाचेची रक्कम पंचासमक्ष स्वीकारली. त्यामुळे लाचेच्या रकमेसह त्याला ताब्यात घेऊन सिटी चौक येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयात सहाय्यक नगर रचनाकार म्हणून कार्यरत असलेल्या पवन परिहार याच्यावर मागील आठवड्यात लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तक्रारदार हे समर्थ इन्फ्रा फर्म कन्स्ट्रक्शनच्या वतीने काम पाहतात. त्यांचे चिखलठाणा शेत गट क्र.377 मधील 17 हजार 100 स्क्वेअर मीटर या जागेच्या विकासन करारनाम्याचे शासकीय मुल्यांकन निश्चित करण्यासाठी त्यांनी अर्ज दाखल केला होता. मात्र, पवन परिहार याने यासाठी पंचासमक्ष 1 लाख 50 हजार रुपयांची लाच मागणी केली होती. तडजोडीअंती 1 लाख रुपये लाच स्वतः स्वीकारण्याचे मान्य केले होते. त्यामुळे या प्रकरणी सिडको पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन दिवसांपूर्वी सिल्लोड येथील केळगाव ग्रामपंचायतमधील सरपंच पती आणि उपसरपंच बबन रामसिंग चव्हाण यांच्यावर देखील एसीबीने कारवाई केली आहे. यातील तक्रारदार यांना वसुली कारकून म्हणुन कामावर ठेवणे बाबत ग्रामपंचायतने ठराव केला होता. त्यानंतर पंचायत समिती मार्फत तक्रारदार कायम होवुन पगार सुरू झाला. मात्र, ग्रामपंचायतमध्ये लिपीक व वसुली कारकून यांचेपैकी एकच पद भरता येणार होते. दोन्ही आरोपींनी मिळून तक्रारदार यास आम्हास लिपीक पदासाठी एकाने तीन लाख रूपये दिले आहे, तेव्हा तु आम्हास तीन लाख रूपये दे नाहीतर आम्ही पुन्हा तुझ्याविरूद्ध ठराव घेवुन तुला काढुन टाकू. तसेच, तुझ्या ऐवजी लिपीक म्हणुन दुसऱ्याला भरती करू असे म्हणून, तीन लाख रुपये लाच मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदार याने एसबीकडे तक्रार केली आणि पडताळणी अंती दोन लाख लाच रक्कम ठरली. त्यापैकी लगेच एक लाख रुपये पंचासमक्ष घेतांना उपसरपंच व सरपंच पतीला बेड्या ठोकण्यात आल्या. तसेच पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
पैठणचे तत्कालीन तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्यावर देखील एसीबीने कारवाई केली होती. तक्रारदार शेतीसह वाळू वाहतुकीचा व्यवसाय करत होता. तसेच, भागिदारीत असणाऱ्या शेतात अतिवृष्टीमुळे नदीतील वाळूचा साठा झाला होता. त्यामुळे या वाळूचा उपसा करणे आणि दोन हायवाद्वारे वाळू वाहतूक करण्यासाठी तहसीलदार शेळके यांनी एका खासगी व्यक्तीच्या मार्फत महिन्याला 1 लाख 30 हजार रुपयांचा हप्ता देण्याची मागणी केली होती. पंच साक्षीदारांच्या समक्ष लाचेची मागणी केल्यानंतर त्यांच्यावर पैठण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वाळूची वाहतूक करण्यासाठी दीड लाखाची लाच घेताना तहसीलदार किशोर देशमुखवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली होती. औरंगाबाद शहर महसूल हद्दीत वाळूची वाहतूक करायची असल्यास प्रत्येक महिन्याला दीड लाख रुपये देण्याची मागणी देशमुख याने तक्रारदाराकडे केली होती. तसेच लाच न दिल्यास कारवाईची धमकी देशमुखकडून देण्यात आली होती. दरम्यान, तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर दीड लाखाची लाच घेताना तहसीलदार किशोर देशमुखवर कारवाई करण्यात आली होती.
औरंगाबादमध्ये लाचलुचपत विभागाने गेल्या महिन्यात मोठी कारवाई करत, उपविभागीय जलसंधारण अधिकारी ऋषिकेश प्रल्हादराव देशमुख याला बेड्या ठोकल्या होत्या. कोल्हापूर बंधाऱ्याचे झालेल्या कामाचे बील काढण्यासाठी देशमुख यांनी थेट 8.5 लाखांची लाच मागितली होती. त्यामुळे तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. त्यानुसार, पथकाने सापळा लावला आणि 8 लाख 53 हजार 250 रुपये घेतांना देशमुख याला बेड्या ठोकल्या.
एका गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यासाठी तीन लाखाची लाच मागणारा पोलीस कर्मचारी सादिक सिद्दीकीवर एसबीची पथकाने कारवाई करत गुन्हा दाखल केला होता. बीडच्या गेवराई पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सिद्दीकीने तक्रारदार यांच्या मामाला एका गुन्ह्यात जामीन मिळवून देण्यासाठी तीन लाखाची मागणी केली होती. त्यानंतर औरंगाबादच्या लाचलुचपत विभागाने त्याच्यावर कारवाई करत गुन्हा दाखल केला होता.
राष्ट्रपतींच्या हस्ते आदर्श तहसीलदार पुरस्कार स्वीकारणाऱ्या पैठणचा तत्कालीन तहसीलदार महेश सावंतला शेतकऱ्यांकडून 1 लाखाची लाच घेतांना पकडण्यात आले होते. धक्कादायक म्हणजे सावंतने 30 लाखाची लाच मागितली होती. तक्रारदार यांनी खरेदी केलेली कुळाची जमीन परत मिळावी म्हणून मुळ मालकाच्या नातेवाईकांनी आरोपी तहसीलदार पैठण यांच्याकडे केलेल्या तक्रारीमध्ये दाव्यामध्ये तक्रारदार यांच्या बाजूने निकाल देण्यासाठी सावंतने लाच मागितली होती.
जालना येथील पाटबंधारे विभाग कार्यालय येथे कार्यरत बालाप्रसाद एकनाथराव रनेर आणि विजय हरीसिंग सोळंकी यांच्यावर दोन दिवसांपूर्वी लाचेची मागणी केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. यातील तक्रारदार हे पाटबंधारे विभाग कार्यालय जालना येथुन चौकीदार पदावरून सेवानिवृत्त झाले आहे. सेवानिवृत्ती नंतर मिळणारे लाभ भविष्य निर्वाह निधी, रजा रोखीकरण आणि सातवे वेतन आयोगाचा हफ्ता असे बील काढुन देण्यासाठी आरोपींनी 11 हजारांची लाच मागीतीली होती. तक्रारदार, यांनी केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली होती.
इतर महत्वाच्या बातम्या: