Aurangabad News : पावसाळा (Rain) सुरु असल्याने पर्यटनस्थळी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दरम्यान अशाच वेळी अनेक पर्यटक धोकादायक ठिकाणी आपला जीव धोक्यात घालून सेल्फी घेण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतायत. दरम्यान, असाच काही प्रकार औरंगाबादच्या अजिंठा लेणीसमोर (Ajanta Caves) असलेल्या (व्ह्यू पॉईंट) धबधब्याच्या ठिकाणी समोर आला असून, एक 30 वर्षीय तरुण थेट लेणीच्या 70 फूट कुंडात पडला होता. मात्र, पोलिसांनी बचावकार्य करून या तरुणाला वाचवलं आहे. गोपाल पुंडलिक चव्हाण (वय 30 वर्ष रा. नांदातांडा ता. सोयगाव) असं या तरुणाचं नाव आहे.
सध्या अजिंठा लेणी पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. विशेष म्हणजे 23 जुलै रोजी रविवार असल्याने पर्यटकांची गर्दी अधिक होती. विशेष म्हणजे यावेळी आलेले अनेक पर्यटक लेणीच्या समोरील (व्ह्यू पॉईंट) धबधब्याच्या ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी येत असल्याचं पाहायला मिळतं. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील गोपाल हे आपल्या इतर चार मित्रांसह अजिंठा लेणी बघायला आले होते. यावेळी या चारही मित्रांनी लेणी पाहिल्यावर कुंड असलेल्या अजिंठा लेणीच्या धबधब्याच्या ठिकाणी गेले. तर, यावेळी गोपाल यांनी आपला मोबाईल काढून सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचवेळी त्याचा तोल गेला आणि तो थेट दोन हजार फूट खोल असलेल्या सप्त कुंडात पडला.
गोपाल थेट वरून दोन हजार फूट खोल असलेल्या सप्त कुंडात पडल्याने एकच गोंधळ उडाला. त्याच्या मित्रांनी आरडाओरडा सुरु करत मदतीची मागणी सुरु केली. पण याचवेळी खाली पडलेल्या गोपालला पोहता येत असल्याने त्याने कसे तरी कुंडातील कपारीला पकडून आपला जीव वाचवला. दरम्यान, याची माहिती मिळताच पोलीस आणि पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर दोरी बांधून त्याला वर काढण्यात आले. गोपाल वर आल्यावर अखेर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
काळजी घेण्याचे आवाहन...
सध्या पावसाळा सुरु असल्याने अनेकजण ट्रीपचे आयोजन करतात. विशेष करून धरण, धबधब्याचा ठिकाणी जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. दरम्यान, अजिंठा लेणी समोरील धबधब्याचा ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या देखील मोठी आहे. त्यातच मागील काही दिवसांत झालेल्या पावसामुळे लेणीचा धबधबा ओसंडून वाहत असल्याने गर्दी अधिकच वाढत असल्याचं चित्र आहे. तर यावेळी येणारे पर्यटक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी धबधब्याजवळ जातायत. विशेष म्हणजे हा धबधबा जवळपास दोन हजार फूट उंचावरून कोसळतो. मात्र, असे असताना काही अतिउत्साही पर्यटक व्ह्यू पॉईंट जवळून थेट डोंगरावर जाऊन सेल्फी काढताना पाहायला मिळतात. तर, अनकेदा सुरक्षारक्षक यांनी हुसकावून लावल्यावर देखील तरुण अशाप्रकारे अतिउत्साहीपणा करतात. त्यामुळे लेणी आणि धबधबा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी असे जीव धोक्यात घालून सेल्फीचा मोह टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
काय सांगता! धामणीने बंद पाडला अख्ख्या शहराचा पाणीपुरवठा; विघ्न संपता संपेना