औरंगाबाद : शेतात प्रेत पुरण्यात आल्याची अफवा पसरली, गावकरी जमा झाले. माहिती मिळताच पोलीस आणि महसूल विभाग घटनास्थळी पोहचले. खड्डा खोदण्यास सुरुवात झाली. पाहता-पाहता अख्खं गाव घटनास्थळी पोहचले. खड्ड्यात काय असणार, कोणाचा प्रेत असणार, कोणी पुरलं असेल अशी चर्चा सुरु झाली. काही वेळेत खड्डा बराच खाली खोदून झाला आणि त्यात काय तर तीन हिरवेगार लिंबू (Lemon) आढळून आले. लिंबू पाहून सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला, पण "खोदा पहाड़ निकला चुहा" अशी गत झाली. शेवटी सोयगाव पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.
अधिक माहिती अशी की, सोयगावच्या शिदोंळ गावापासून काही अंतरावर असलेल्या शेतात शेतकरी शरद आत्माराम भदाणे हे मंगळवारी सकाळी गेले होते. दरम्यान, यावेळी त्यांना सहा फुट लांब, तीन फुट रुंद आणि तीन फुट खोल असलेला खड्डा त्यांना दिसला. त्यांनी गावात आल्यावर काही ग्रामस्थांना याची माहिती दिली. याची चर्चा गावभर पसरली. वेगवेगळे तर्कवितर्क करण्यात येत होते. हा खड्डा कशाचा या चर्चेला उधाण आले होते. त्यातून या शेतातील खड्ड्यात मृतदेह पुरविल्याची अफवा पसरली. तर काही गावकऱ्यांनी याची माहिती सोयगाव पोलीस ठाण्यात संपर्क करुन शेतात असलेल्या खड्याबाबत कळवले.
याची माहिती मिळाल्यावर घटनास्थळी सोयगावचे पोलिस निरीक्षक अनमोल केदार आणि तहसीलदार मोहनलाल हरणे यांच्यासह पथक पोहचले. पोलीस निरीक्षक अनमोल केदार, तहसीलदार मोहनलाल हरणे यांच्या पथकाने घटनेची चित्रीकरण करून खड्ड्याचे खोदकाम सुरू केले. गावात मृतदेहाची अफवा पसरली असल्याने घटनास्थळी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी झाली होती. खड्ड्यात काय असणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. शेवटी बराच खोदकाम झाल्यावर त्यामध्ये तीन लिंबू आढळून आले.
अफवा, गर्दी आणि चर्चा....
आपल्या शेतात असलेल्या खड्ड्याची माहिती शरद भदाणे यांनी ग्रामस्थांना दिली. पाहता-पाहता याची चर्चा गावभर झाली. त्यात महिती मिळताच पोलीस आणि तहसीलदार देखील गावात दाखल झाल्याने चर्चांना आणखीच उधाण आले. शेवटी खड्डा पुन्हा खोदण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. खड्ड्यात नेमकं काय असणार याची सर्वानाच उत्सुकता होती. शेवटी त्यात लिंबू निघाले. त्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि मृतदेहाची फक्त अफवाच असल्याचं स्पष्ट झाले. पण ते लिंबू कोणी आणि का पुरले याचा मात्र काही शोध लागू शकला नाही.
इतर महत्वाच्या बातम्या :