Aurangabad Crime News : औरंगाबादच्या (Aurangabad) सोयगाव तालुक्यातील नांदगाव तांडा येथे धक्कादायक प्रकार समोर आला असून, ढाब्यावरील अवैध दारुविक्रीवर छापा मारल्याचा राग अनावर झाल्याने चौघांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वाहनावर पेट्रोल टाकून जाळून जाळण्याचा प्रयत्न केला आहे. तर याचवेळी आरोपींनी पथकातील एका महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र या महिला कर्मचाऱ्याने जीव मुठीत घेऊन स्वतःला वाचवले. बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली असून, या प्रकरणी दोघांना अटक केली असून दोघे फरार आहेत. बद्री महारु राठोड (वय 39 वर्षे), संदीप बद्री राठोड (वय 23 वर्षे), किरण बद्री राठोड (वय 21 वर्षे) आणि राहुल भाईदास राठोड (वय 22 वर्षे) असे आरोपींची नावं आहेत.
अधिक माहिती अशी की, सोयगाव तालुक्यातील नांदगाव तांडा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकातील अधिकारी अनिरुद्ध पाटील, निरीक्षक रोठे, दुय्यम निरीक्षक श्रीमती माने, कृष्णा पाटील, हर्षल बारी, शारेख कादरी, वाहनचालक शिवशंकर मपडे यांच्या पथकाने बुधवारी (19 जुलै) सायंकाळी एका ढाब्यावर छापा टाकला. यावेळी या पथकाने 70 ते 80 लिटर ताडी आणि विनापरवाना देशी दारुचे खोके असा मुद्देमाल जप्त केला. यावेळी ढाबाचालक बद्री महारु राठोड यांच्या घरात झडती घेण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक वळले. दरम्यान कारवाईसाठी आलेल्या उत्पादन शुल्क विभागाच्या लाल दिव्याच्या शासकीय वाहनावर पेट्रोल टाकून चौघांनी पेटवले.
आरोपी पेट्रोलची बाटली घेऊन महिला कर्मचाऱ्याच्या मागे लागले
चारही आरोपींनी पोलिसांचे शासकीय वाहन पेटवून दिल्यावर, पथकाच्या दिशने मोर्चा वळवला. त्यानंतर पथकातील महिला पोलीस कर्मचारी शारेख कादरी यांच्या मागे राहुल भाईदास राठोड, किरण बद्री राठोड, संदीप राठोड हे तिघेही पेट्रोलची बाटली घेऊन धावत सुटले. त्यामुळे कर्मचारी शारेख कादरी यांनी जीव मुठीत घेऊन स्वतःला वाचवले. यावेळी या पथकाने गावातून सुटका करुन घेत सोयगाव पोलीस ठाणे गाठले. या घटनेची माहिती मिळताच सोयगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन धरपकड मोहीम राबवली. यावेळी संदीप बद्री राठोड आणि राहुल भाईदास राठोड या दोघांना अटक केली. अन्य दोघे फरारच आहेत.
वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातून अधिकची कुमक मागवली
दरम्यान या घटनेनंतर नांदगाव तांड्यात रात्रभर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नांदगाव तांड्यावर सोयगाव, फर्दापूर, अजिंठा, सिल्लोड, आदी ठिकाणावरुन पोलिसांची अधिक कुमक मागवून घेण्यात आली. त्यामुळे नांदगाव तांड्यात छावणीचे स्वरुप प्राप्त झाले होते. तर फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
धक्कादायक! शाळकरी मुलांमध्ये झालेल्या भांडणातून विद्यार्थ्याचा मृत्यू; औरंगाबादच्या दौलताबादची घटना