Aurangabad News : औरंगाबाद (Aurangabad) शहरातील सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयात पुन्हा एकदा पाळणा हलला आहे. सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील (Siddharth Zoo Aurangabad) ‘समृद्धी’ वाघीण (Tigress) चौथ्यांदा आई बनली आहे. तीन वर्षांपूर्वी समृद्धी या वाघिणीने पाच बछड्यांना जन्म दिला होता. त्यानंतर आता समृद्धी पुन्हा गर्भवती होती. दरम्यान आज सकाळी 6 ते 7 वाजेच्या दरम्यान एका बछड्यास तिने जन्म दिला आहे. विशेष म्हणजे, मागील 28 वर्षांत या उद्यानात 40 वाघांचा जन्म झाला आहे. आता ही संख्या 41 वर पोहचली आहे.
मनपा प्राणीसंग्रहालयातील पिवळे वाघ समृद्धी हीने आज (19 जुलै) रोजी सकाळी 6 ते 7 वाजेच्या दरम्यान एका बछड्यास जन्म दिलेला आहे. समृद्धी वाघीण आणि बछड्याची तपासणी प्राणीसंग्रहालय पशुवैद्यक यांचे मार्फत करण्यात आलेली आहे. दोघांची तब्येत सुदृढ आहे. बछडे आईचे दुध पितांना दिसून आले आहे. वाघीण स्वतः बछड्याची निगा आणि काळजी घेत आहे. तसेच वाघिणीच्या, बछड्याच्या 24 तास देखभालीसाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. अशी माहिती प्राणिसंग्रहालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
चौथ्यांदा बनली आई...
सिद्धार्थ आणि समृद्धी या वाघाच्या जोडीने प्रथम वेळी 12 नोव्हेंबर 2016 रोजी तीन पिवळे, एक पांढरा बछड्यास जन्म दिला होता. दुसऱ्या वेळी 16 एप्रिल 2019 रोजी चार बछड्यांना जन्म दिला होता, ज्यात दोन पिवळे तर दोन पांढरे होते. तिसऱ्या वेळी 25 डिसेंबर 2020 रोजी पाच पिवळ्या बछड्यांना जन्म दिला होते. त्यानंतर आता तीन वर्षांनी आज 19 जुलै 2023 रोजी चौथ्यावेळी एका बछड्यास जन्म दिला आहे. तर आतापर्यंत जन्म झालेल्या या वाघांमधील एक जोडी पुणे प्राणीसंग्रहालय येथे तर दोन पिवळे वाघ मादी हे अहमदाबाद प्राणीसंग्रहालय येथे स्थलांतरीत करण्यात आलेले आहेत. इतर वाघ प्राणीसंग्रहालयातच आहेत अशी माहिती प्र. पशुवैद्यकीय अधिकारी ,छत्रपती संभाजीनगर यांनी दिली आहे.
उद्यानात सध्या 10 वाघ
सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयात सध्या 10 वाघ आहेत. त्यांतील सहा मादी तर चार नर आहेत. देशात वाघांच्या कमी होणाऱ्या संख्येवर चिंता व्यक्त केली जात आहे. परंतु, छत्रपती संभाजीनगर मनपावर वाघांची संख्या कमी करण्याची वेळ आली आहे. वाघांना योग्य वातावरण मिळणाऱ्या सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयात मागील 28 वर्षांत 40 वाघांचा जन्म झाला आहे. सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयात वाघ हे पर्यटकांचे खास आकर्षण आहे.
इतर संबंधित बातम्या: