Chhatrapati Sambhajinagar Lok Sabha : छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात (Chhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha) ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र महायुतीचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. एमआयएमकडून विद्यमान खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. तर वंचित बहुजन आघाडीने देखील अफसर खान (Afsar Khan) यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये यंदा बहुरंगी लढत होण्याचे चित्र आहे. 


आता लोकसभा निवडणुकीत एमआयएम पक्षाचे उमेदवार खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रचाराकरीता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) हे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत. शहरात येताच असदुद्दीन ओवैसी यांनी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत सविस्तर चर्चा केली आहे. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (Dr Babasaheb Ambedkar Jayanti 2024) निमित्त असदुद्दीन ओवैसी पैठण गेट येथील विविध स्वागत मंचाला भेटी देत आहेत. 


संभाजीनगरच्या कन्नड, वैजापूरमधून ओवैसींची तोफ धडाडणार


उद्या (दि. 15) खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रचारासाठी असदुद्दीन ओवैसी दुपारी 4 वाजता इम्तियाज जलील यांच्या घरासमोरून समृध्दी महामार्गवरून वैजापूर येथे जाणार आहेत. वैजापूर येथे पोहचताच मुस्तफा पार्क, लाडगाव रोड येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. जाहीर सभेनंतर वैजापूर येथून शिवूर, खामगाव फाटा, औराडा, चापनेर, पाणपोई मार्ग कन्नड येथे ते पोहोचणार आहेत. कन्नड येथे रात्री 8.00 वाजता कुंजखेडा मदरसा येथे भेट देवून 8.30 वाजता सानियानगर कन्नड येथील जाहीर सभेस असदुद्दीन ओवैसी संबोधित करणार आहे.


यंदाची निवडणूक एमआयएमसाठी आव्हान 


दरम्यान, 2019 साली झालेल्या निवडणुकीत वंचित आघाडीसोबत एमआयएमने केलेल्या युतीचा इम्तियाज जलील यांना मोठा फायदा झाला होता. मात्र यंदा परिस्थिती वेगळी आहे. या निवडणुकीत एमआयएमला ही जागा स्वबळावर लढवावी लागणार आहे. एमआयएमला यंदा स्वबळावर निवडणूक लढवावी लागणार असल्याने हे मोठे आव्हान मानले जात आहे. याचाच भाग म्हणून असदुद्दीन ओवैसी संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत. 


वंचितच्या उमेदवारीमुळे जलील यांच्या अडचणीत वाढ


तर वंचित बहुजन आघाडीने मुस्लिम मतांचे विभाजन व्हावे यासाठी काँग्रेसचे माजी नगरसेवक अफसर खान यांना उमेदवारी दिली आहे. वंचितमुळे निर्माण झालेली मतांमधील तूट आणि अफसर खान यांच्या उमेदवारीने इम्तियाज जलील यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे बोलले जात आहे. आता असदुद्दीन ओवैसी यावर तोडगा काढणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  


आणखी वाचा 


Amit Shah : 'ज्या काँग्रेसने बाबासाहेबांचा पराभव केला, तेच आता बाबासाहेबांच्या नावाने मतं मागताय', अमित शाहांचा घणाघात