Adarsh Scam : औरंगाबादच्या (Aurangabad) आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील गैरव्यवहार समोर आला असून, 200 कोटींपेक्षा अधिकचा हा आकडा आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आदर्श घोटाळा समोर आल्यावर ठेवीदारांची चिंता वाढली आहे. तर, औरंगाबादच्या आदर्श बँकेत ठेवलेली 27 लाखांची ठेव बुडण्याच्या धास्तीने मानसिक तणावात आणखी एका ठेवीदाराचा मृत्यू झाला. भानुदास रामभाऊ उकर्डे असं त्यांचं नाव आहे. 


औरंगाबादच्या आदर्श बँकेत 200 कोटींचा घोटाळा झाल्यानंतर हजारो ठेवीदार सध्या मोठ्या संकटात सापडले आहेत. भानुदास उकर्डे यांनी आदर्श बँकेत 27 लाख 50 हजार रुपयांची ठेव ठेवली आहे. त्याशिवाय त्यांच्या कुटुंबियांची जवळपास 1 कोटी रुपयांची ठेव बँकेत आहे. जिल्ह्यातील करमाड येथील आदर्श बँकेत शेतकऱ्यांनी डीएमआयसी आणि समृद्धीमध्ये गेलेल्या शेतीचा पैसा मोठ्या व्याजाच्या आमिषाने ठेवी म्हणून ठेवलेले कोट्यवधी रुपये अडकलेले आहेत. भानुदास उकर्डे यांनी आदर्श बँकेत 27 लाख 50 हजार रुपयांची ठेव ठेवली आहे. ठेवीची मुदत संपल्यानंतर बँकेचा घोटाळा समोर आला. आता भानुदास उकर्डे यांच्या निधनामुळे आदर्श घोटाळ्यातील हा दुसरा बळी ठरला आहे.


यापूर्वी शेतकऱ्याने केली होती आत्महत्या... 


तर याच पतसंस्थेत 22 लाख रुपयांची ठेव बुडाल्याच्या भीतीने रामेश्वर नारायण इथर या 38 वर्षीय शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. रामेश्वर यांनी मुलीच्या शिक्षणाची आणि लग्नाची तजवीज म्हणून ही रक्कम पतसंस्थेत जमा केली होती. तर रामेश्वर यांचे वडील नारायण इथर यांच्या नावे या पतसंस्थेत साडेआठ लाख रुपये, आई कासाबाई यांच्या नावे 9 लाख रुपये आणि मुलगी अश्विनीच्या नावे 5 लाख रुपयांच्या ठेवी ठेवल्या होत्या. बँकेचा घोटाळासमोर आल्याने आणि पैसे बुडाल्याच्या भीतीने ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. 


सुना म्हणतात सासऱ्यांनीच केला घोटाळा 


मागील काही दिवसांपासून गाजत असलेल्या औरंगाबादच्या आदर्श पतसंस्थेतील 200  कोटींच्या घोटाळा प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत आहे. 11 ऑगस्टला मुख्य आरोपी अंबादास मानकापे याच्या दोन्ही सुनांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र, हा संपूर्ण घोटाळा सासऱ्यांनीच केल्याचे जबाब सुनांनी पोलिसांना दिले आहेत. विशेष म्हणजे पोलिसांनी 15 ऑगस्टला मुलगा सुनील अंबादास मानकापे याला अटक केली. त्यानेही वडिलांना आपण पाया पडून समजावून सांगत होतो, पण त्यांनी आमचे ऐकले नाही असा जबाब दिला आहे. त्यामुळे या संपूर्ण घोटाळ्याचा अंबादास मानकापेच मास्टरमाईंड असल्याचे बोलले जात आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


औरंगाबादेतील 'आदर्श घोटाळ्या'चा पहिला बळी; पतसंस्थेतील 22 लाख रुपये बुडण्याच्या धास्तीने आत्महत्या