School Uniform: शाळेचा गणवेश ठराविक दुकानातून घेण्याची सक्ती अनेक शाळांकडून का केली जाते? याचा पर्दाफाश करण्यासाठी एबीपी माझानं छत्रपती संभाजीनगरमध्ये स्टिंग ऑपरेशन केलं. त्याची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आहे. शाळेने एकाच दुकानातून गणवेश खरेदीची सक्ती केल्यास कारवाई होणार असल्याचे पत्र छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहे. 'एबीपी माझा'च्या स्टिंग ऑपरेशननंतर प्रशासनाने
कारवाईचा बडगा उगारला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत पत्रक काढून ठराविक दुकानातून पुस्तक खरेदीची सक्ती केल्यास कारवाई होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अशा प्रकारची सक्ती झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचे आवाहन पालकांना करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी काढलेल्या पत्रकानुसार, सध्या सुरू झालेल्या शैक्षणिक वर्षात शालेय साहित्य, वह्या, पुस्तके आणि गणवेश एका ठाराविक विक्रेत्याकडून घेण्यास सक्ती करणे हे बेकायदेशीर असल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. अशा प्रकारची सक्ती केल्यास शाळेच्या व्यवस्थापनाविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत.
आपल्या मुलांना उत्तम शिक्षण मिळावं यासाठी पालक जीवाचं रान करतात. कधी ओव्हारटाईम करून तर कधी काटकसर करून आपल्या पाल्यांच्या शिक्षणाचा खर्च ते करत असतात. पण शिक्षणाच्या नावाखाली याच पालकांची कोंडी केल्याचा प्रकार समोर आला. शाळेचा गणवेश विशिष्ठ दुकानातूनच घ्यायचे अशी सक्ती अनेक शाळांकडून केली जाते. या सगळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी एबीपी माझानं छत्रपती संभाजीनगरमध्ये स्टिंग ऑपरेशन केलं. आणि यामधून धक्कादायक वास्तव समोर आलं.
लाखांमध्ये फीस घ्यायची तरी देखील मुलांच्या पेन्सीलपासून, सॉक्स, बूट ते लहान मुलांच्या रुमालापासून देखील कमिशन खाणारे हे संस्थाचालकांचा भंडाफोड या स्टिंग ऑपरेशनने केला. फक्त छत्रपती संभाजीनगरमध्ये अशा प्रकारची सक्ती होत नसून राज्यात जवळपास सगळ्याच जिल्ह्यात अशी परिस्थिती आहे.
कमिशनसाठी विशिष्ट दुकानातून सक्ती
शाळेकडून, शालेय व्यवस्थापनाकडून एकाच विक्रेत्याकडून शालेय साहित्य, गणवेश घेण्याची सक्ती करण्यात आली होती. कमिशनसाठी ही सक्ती केली जात असल्याचे समोर आले आहे. गणवेश विक्रेते या शाळाचालकांना 10 टक्के कमिशन देतात. वर्षाला हजारो गणवेशांचा खप होतो. त्यामुळे कमिशनचा हा खेळ कोट्यवधींमध्ये जातो. या सगळ्यांचा पर्दाफाश करण्यासाठी एबीपी माझानं छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) स्टिंग ऑपरेशन केलं. या स्टिंग ऑपरेशनमध्ये सगळं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.