चंद्रपूर : जिल्ह्यातील जगप्रसिद्ध असलेल्या ताडोबा (Tadoba) व्याघ्र प्रकल्पाच्या (Tiger Project) पर्यटनाला रविवार (1 ऑक्टोबर) पासून सुरुवात करण्यात आलीये. मात्र ताडोबा व्याघ्रप्रकल्पाचं सर्वात मोठं आकर्षण समजली जाणारी माया वाघीण अजूनही पर्यटकांच्या नजरेस पडलेली नाही. त्यामुळे अनेक प्रकारच्या चर्चांना उधाण आलंय. 


माया ही वाघीण अतिशय धीट असून जगभरात तिचे लाखो चाहते आहेत. तिचे लाखो फोटो आणि व्हिडिओ समाज माध्यमांवर लोकप्रिय आहेत. त्यामुळे माया वाघिणीचा माग काढण्यासाठी सध्या 125 कॅमेरा ट्रॅप लावण्यात आलेले आहे. मात्र माया वाघिणीचा अधिवास असलेल्या पांढरपौनी भागात सध्या खूप पाणी असल्याने आणि या वाघिणीचा जुना अनुभव बघता या भागात Foot पेट्रोलिंग शक्य नाही. त्यामुळे वाहनांच्या मदतीने देखील तिचा माग काढला जात आहे. माया वाघीण शेवटची 25 ऑगस्टला पंचधारा या लोकेशन वर मजुरांना दिसली होती. त्यावेळी ती प्रेग्नंट असल्याचं वाटत होतं, त्यामुळे तिच्या जवळ छोटे बच्चे असल्याने ती बाहेर येत नसावी अशी एक शक्यता आहे.


माया सध्या 13 वर्षांची


 सोबतच मायाच्या टेरेटरी मध्ये सध्या छोटी तारा आणि रोमा या दोन वाघिणी पण दिसत आहे. त्यामुळे मायाने आपला परिसर बदल्याची  देखील शक्यता आहे आणि शेवटचं म्हणजे माया सध्या 13 वर्षांची आहे आणि या वयात वाघाचा नैसर्गिक मृत्यू होणे स्वाभाविक असल्याने वनविभाग यादृष्टीने पण शक्यता तपासत आहे. माया या वाघिणीची टी-12 नावाने वनविभागाच्या दफ्तरीत नोंद आहे. अंधारी व्याघ्रप्रकल्पातील सेलिब्रिटी वाघीण अशी ओळख ‘माया’ ची आहे. पर्यटकांना ती कधी एकटी कधी इतर  वाघांसह तर कधी पिल्लांबरोबर दिसून येते. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघांना बघण्यासाठी देश विदेशातील पर्यटक येत असतात. 


जगभरातील पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचं केंद्र


चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प जगभरातील पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचं केंद्र राहिले आहे. पट्टेदार वाघांची भूमी म्हणून ताडोबा ओळखलं जाते. पट्टेदार वाघाचं हमखास दर्शन इथं होत असल्यानं पर्यटकांसोबतच हौशी छायाचित्रकारही मोठ्या संख्येनं इथं हजेरी लावतात. ताडोबा-जंगलात प्राण्यांना नावे देण्याची एक अलिखित प्रथा आहे. माया या वाघिणीला देखील अशाच प्रकारे काही वर्षांपूर्वी माया हे नाव देण्यात आलं. पांढरपौनी भागात आपल्या बछड्यासह भटकणारी ही माया पर्यटकांना कधीच निराश करीत नाही


व्याघ्र प्रकल्प हिरवाईने नटला


यंदाच्या वर्षात ताडोबा व्याघ्र प्रकल्पात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ताडोबा प्रकल्पामध्ये  घनदाट हिरवाई पसरली आहे. ताडोबामधील नदी आणि नाले ओसंडू वाहू लागले आहेत. त्यामुळे अशा आल्हाददायक वातावरणामध्ये पर्यटकांना मनमुराद पर्यटनांचा आनंद लुटता येणार आहे. वाघ, बिबट्या, रानगवे, चितळ आणि सांबर या सारख्या वन्यप्राण्यांचे दर्शन पुन्हा होईल.