चंद्रपूर: तुम्हाला निर्णय मान्य नसेल तर, सुप्रीम कोर्टात तुम्ही रिव्ह्यू पिटिशन दाखल करू शकता. मात्र अशा पद्धतीने अपशब्द वापरणे, असभ्य, असंसदीय भाषेत वक्तव्य वारंवार करणे म्हणजे, बुडत्याचा पाय खोलात आहे. आधीच आपले 75 टक्के दुकान बंद झालं आहे. अशीच जर कृती करत राहिले तर, उरलेलं दुकान देखील बंद होईल. अशी बोचरी टीका सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी ठाकरे गटावर (Thackeray Group ) केली आहे. मी गेल्या 30 वर्षांपासून आमदार आहे. माझ्या अनुभवातून मी सांगतो, हक्कभंगाची ही एकदम फिट केस आहे. मात्र हक्कभंग आणण्याच्या बाबतीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwkar) हे ठरवतील, असे देखील मुनगंटीवार म्हणाले. ते चंद्रपूर येथे बोलत होते.
आमदार अपात्रता प्रकरणी आलेल्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरेंनी असंसदीय भाषेत वक्तव्य केले, त्यांच्या विरोधात हक्कभंग आणण्यासाठी आमची प्रक्रिया सुरू झालीय, अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे उत्पादन शुल्कमंत्री मंत्री शंभुराज देसाई यांनी दिली आहे. यावर राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
....म्हणजे, बुडत्याचा पाय खोलात
शिवसेनेचा 7 -12 हा एकट्या उद्धव ठाकरेंचा कसा होऊ शकेल, कार्यकर्ते आणि ठाकरेंचा उर्वरित परिवार शिंदेच्या सोबत आहे. त्यामुळे पक्ष तुमचा आहे. हे म्हणण्याचा अधिकार तुम्हाला कदापि नाही. आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल संपूर्ण न्यायालयीन प्रक्रिया पार पाडून देण्यात आलेला आहे. मात्र दिलेला निकाल जर तुम्हाला मान्य नसेल तर तुम्ही सुप्रीम कोर्टात रिव्यू पिटिशन दाखल करू शकता. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांविधानिक निर्णय दिला. तुम्ही त्यांच्या विरोधात असभ्य, असंसदीय भाषेत सतत टीका करता म्हणजे, बुडत्याचा पाय खोलात असल्याचेदेखील सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
हक्कभंगाची एकदम फिट केस
मी गेल्या 30 वर्षांपासून आमदार आहे. त्यामुळे माझ्या अनुभवातून मी हे सांगू शकतो, हक्कभंगाची ही एकदम फिट केस आहे. मात्र हक्कभंग आणायचा की नाही, हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे ठरवतील. कारण मी ज्यावेळी स्वर्गीय आर आर आबांच्या विरोधात अपशब्द काढले होते, त्यावेळी मला देखील 90 दिवसांची शिक्षा झाली होती. त्यामुळे ही एकदम फिट केस आहे, असे मी ठामपणे सांगतो, असे त्यांनी यावेळी सांगितले.