चंद्रपूर: एकीकडे महाराष्ट्र आणि कर्नाटकचा सीमाप्रश्न चांगलाच गाजत असला तरी दुसरीकडे चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील 14 गावं ही महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमावादात अडकली आहेत. मात्र या 14 गावातील एक घर असंही आहे जे दोन राज्यांच्या सीमांनी (Maharashtra Telangana Border Dispute) विभागलं गेलं आहे. यातील आणखी एक महत्त्वाची रंजक गोष्ट म्हणजे या गावातील एका घराचे स्वयंपाकघर हे महाराष्ट्रात आहे तर बैठक खोली ही तेलंगणात येते. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात महाराज गुडा या गावात हे अनोखं घर आहे. 


तुम्हाला वाटेल कदाचित हा एखादा राजवाडा असेल जो खूप मोठा असल्याने दोन राज्यात विभागला गेला असेल. पण असं काहीही नाही, तर हे आहे फक्त आठ खोल्यांचं घर. हे घर महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यात विभागलं गेलं आहे.


महाराज गुडा गावातील आठ खोल्यांच्या या घरात पवार कुटुंबीय वास्तव्यास आहेत. 1960 साली मराठवाड्यात पडलेल्या दुष्काळात पवार कुटुंब जिवती मध्ये स्थलांतरित झालं. अनेक वर्ष महाराष्ट्रात राहिल्यावर अचानक तेलंगणाच्या सरकारने या 14 गावांवर स्वतः चा हक्क सांगितला आणि त्यामध्ये महाराज गुडा या गावाचा समावेश होता. त्यामुळं अर्ध गाव तेलंगणात तर अर्ध गाव महाराष्ट्रात आहे. त्यातही हद्द म्हणजे पवार यांचं घर तर दोन्ही राज्याच्या सीमांनी विभागलं गेलं.


चंद्रपूर जिल्ह्यातील 14 गावं ही महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमावादात गेल्या अनेक वर्षांपासून अडकली आहेत. या गावांवर तेलंगणा आणि महाराष्ट्र सरकार अधिकार सांगतात. या गावात दोन्ही राज्यांच्या ग्रामपंचायती- अंगणवाडी- शाळा, रुग्णालये आणि कल्याणकारी योजना अस्तित्वात आहेत. देशामध्ये एकाच ठिकाणचे नागरिक एकाच निवडणुकीत दोनदा मतदान करतात असेही उदाहरण इथेच सापडते. मात्र हा सर्व वाद चुकीचा असून ही गावं महाराष्ट्राचीच असल्याचा या भागातील लोकांचा दावा आहे.


तेलंगणा राज्याने आपली सीमा निश्चित केली असली तरी या सीमेला मान्यता नाही. सुप्रीम कोर्टाने देखील ही गावं महाराष्ट्राची असल्याचं मान्य केलं आहे. त्यामुळे आता तरी आपल्या राज्याने 100 टक्के मराठी भाषिक असलेल्या या गावांना आपल्या राज्यात तातडीने समाविष्ट करावं हीच सिमावासीयांची अपेक्षा आहे.


ही बातमी वाचा: