चंद्रपूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पामुळे संपूर्ण जगात ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्याला आता राष्ट्रीय स्तरावर आणखी एक बहुमान मिळणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान लाकडाचा वापर हा आपल्या देशातील संसदेच्या नवीन इमारतीसाठी म्हणजे सेंट्रल विस्टासाठी केला जाणार आहे.


चंद्रपूर म्हणजे राज्यातील सर्वाधिक जंगल आणि वाघ असलेला जिल्हा. आता हेच जंगल पुन्हा एकदा चंद्रपूरसाठी आणखी एका अभिमानास्पद गोष्टीचं निमित्त ठरलं आहे. आपल्या नवीन संसद भवन म्हणजे नवी दिल्ली इथे तयार होत असलेल्या 'सेंट्रल विस्टा'मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान लाकडाचा वापर केला जाणार आहे. किमान 200 वर्ष टिकू शकेल असं हे लाकूड आहे. यासोबतच चंद्रपूर जिल्ह्यातील लाकडामध्ये आढळणारा रिंग आणि ग्रेन पॅटर्न हा देशात सर्वाधिक सुंदर असल्यामुळे या लाकडाची निवड करण्यात आली आहे. 


सेंट्रल विस्टासाठी भारतीय लाकूड वापरावे की विदेशी असा प्रश्न या इमारतीच्या कंत्राटदार कंपनी समोर होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मेक इन इंडिया' संकल्पनेअंतर्गत भारतीय लाकूडच वापरण्याचे निर्देश दिले. विशेष म्हणजे कुठल्या भारतीय लाकडाचा वापर करावा यावर देखील मोठी काथाकूट झाली आणि सर्व प्रकारच्या निकषांवर चंद्रपूरचेच सागवान हे सर्वोत्तम ठरले.


नवीन संसद इमारतीचे म्हणजे 'सेंट्रल विस्टा'च्या इंटिरिअरचं काम मुंबईच्या नरसी इंटिरिअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला मिळालं आहे. संसद भवनाच्या इंटिरिअरसाठी या कंपनीने बल्लारपूर इथल्या वनविभागाच्या लाकूड डेपोमधून 400 घन मीटर सागवान खरेदी केला आहे आणि 200 घनमीटर अजून खरेदी करणार आहे. त्यामुळे सेंट्रल विस्टासोबत अशाप्रकारे चंद्रपूरचं नाव आता जोडलं जाणार आहे.


सेंट्रल विस्टा प्रकल्प काय आहे? 
सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट अंतर्गत नव्या संसद भवनाचं बांधकाम केलं जाणार आहे. यामध्ये 876 जागांचा लोकसभा, 400 जागांचा राज्यसभा आणि 1224 जागांचा सेंट्रल हॉल बनवला जाणार आहे. यामुळे संसदेच्या संयुक्त बैठकीदरम्यान सदस्यांना अतिरिक्त खुर्ची लावून बसण्याची गरज संपेल. याशिवाय केंद्रीय मंत्रालयांसाठी सरकारी इमारती, उपराष्ट्रपतींसाठी नवं निवासस्थान, पंतप्रधानांचं कार्यालय आणि निवासस्थानासह इतर इमारतींचं बांधकाम होणार आहे. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत या प्रकल्पाचं काम सुरु आहे. सुरुवातीला या प्रकल्पाचा अंदाजे खर्च 11, 794 कोटी रुपये होता, आता तो वाढून 13 हजार 450 रुपये झाला आहे. 2022 मध्ये हा प्रकल्प पूर्ण होईल, असा अंदाज आहे. स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनंतर संसदेची अधिवेशनं नव्या भवानातच होतील.7


असं असेल नवं संसद भवन!
नव्या संसद भवानात लोकसभेच्या सभागृहाचा आकार हा सध्याच्या सभागृहापेक्षा तिप्पट असेल. राज्यसभेच्या सभागृहाचा आकारही वाढवला जाईल. एकूण 64,500 चौरस मीटर क्षेत्रात नव्या संसद भवनाचं बांधकाम होणार आहे. टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडकडे याचं काम देण्यात आलं आहे. नव्या संसद भवनाचं डिझाईन एचसीपी डिझाईन प्लॅनिंग अॅण्ड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडने तयार केलं आहे.