Chandrapur Tiger Attack :  चंद्रपुर जिल्ह्यातील (Chandrapur Newsताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात (Tadoba Andhari Tiger Reserve) पुन्हा एकदा वाघाने वनमजुरावर हल्ला केला आहे. पर्यटकांच्या डोळ्यासमोर या वनमजुराला वाघाने (Tiger) जंगलात ओढत नेले आहे. ही थरारक घटना गुरुवारी (दि. 25) सकाळी  ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या(Tadoba Andhari Tiger Reserve)  निमढेला गेट भागात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रामचंद्र हनवते असे या 52 वर्षीय वनमजूराचे नाव असून ते ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात रोजंदारीवर काम करत होते. या हल्ल्यात रामचंद्र यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.


भानूसखिंडी वाघिणीने नेले जंगलात ओढत 


सकाळी रामचंद्र हनवते नेहमीप्रमाणे आपल्या कामावर आले. दरम्यान, ते या भागात असलेली कवठ फळे वेचत होते. या भागात भानूसखिंडी वाघिणीचा वावर आहे. भानूसखिंडी आपल्या बछड्यांसह अनेकदा या भागात फिरत असून तीचे कित्येकदा पर्यटकांना अगदी सहज दर्शन झाले आहे. अशातच आज ती या भागात फिरत असताना रामचंद्र आणि भानूसखिंडी अचानक समोरासमोर आले. दरम्यान, भानूसखिंडी ही आपल्या बछड्यांसह फिरत असल्याने तिला कदाचित धोका वाटत असल्याने तिने अचानक रामचंद्र यांच्यावर हल्ला केल्याचे समजते.


त्यानंतर रामचंद्र यांनी आरडाओरड केला असता जवळील सर्व पर्यटकांचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले. परिणामी भानूसखिंडी वाघिणीने रामचंद्र यांना ओढत जंगलात नेले. या घटनेची माहिती तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली. थोड्या वेळात वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या परिसरात तपास केला असता रामचंद्र झुडपात आढळून आले. मात्र या हल्ल्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.


मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र


चंद्रपूर जिल्ह्यातील जवळपास 900 गावं ही जंगलव्याप्त म्हणजे जंगलालगत आहेत. त्यामुळे वर्षभर या भागात पाळीव जनावरं आणि माणसांवर वन्यप्राण्यांचे हल्ले होत असतात. त्यामुळे हा भाग कायम वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या सावटाखाली असतो. विशेषतः गेल्या काही वर्षात संरक्षणाचे उपाय चांगल्या प्रकारे राबविण्यात आल्यानं जिल्ह्यात वाघ आणि बिबट्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र झाला आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात 50 लोकांचा वाघ-बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. हा गेल्या 10 वर्षातला उच्चांक आहे. उन्हाळ्यात तर संघर्ष अगदी शिगेला पोहोचतो. उन्हाळ्यात पाण्यांचे स्रोत आटल्यानं जंगली जनावरं गावाकडे वळतात आणि कळत-नकळत हल्ले होतात.


इतर महत्वाच्या बातम्या