Chandrapur News: मराठा आणि खुल्या प्रवर्गातील (Maratha Reservation) नागरिकांच्या सर्वेक्षणाच्या कामात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी चंद्रपूर  (Chandrapur)  महानगरपालिकेच्या एका कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. सुनील माळवे असं निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे. सुनील माळवे यांना अनेकवेळा सूचना देऊन देखील त्यांनी प्रशिक्षण कालावधी पूर्ण करून काम स्वीकारले नसल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.


हे सर्वेक्षण महत्वाचे शासकीय कार्य असल्याने मुदतीत आणि  काटेकोरपणे करण्याचे निर्देश चंद्रपूर  (Chandrapur News ) मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी दिले आहेत. सर्वेक्षण निश्चित कालावधीत आणि काटेकोरपणे होणे आवश्यक असल्याने कुठल्याही स्वरूपाची हयगय खपवून घेतली जाणार नसल्याचे देखील आयुक्त विपीन पालिवाल यांनी स्पष्ट केले आहे.


आतापर्यंत 56 हजार 246 कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण 


मराठा समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत 23 जानेवारीपासून युद्धपातळीवर सर्वेक्षण (Survey) करण्यात येत आहे. त्यासाठी राज्यातील सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. अशातच या कामात चंद्रपूर महानगर पालिकेतर्फे 49 पर्यवेक्षक आणि 825 प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना रीतसर प्रशिक्षणसुद्धा देण्यात आले आहे.


सर्वेक्षणात मनपा तसेच इतर शासकीय कर्मचाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली असुन आतापर्यंत 56 हजार 246 कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. नागरिकांचे सहकार्य मिळावे यासाठी सर्वेक्षणाची माहिती ध्वनीक्षेपण यंत्रणा, वृत्तपत्रे आणि समाज माध्यमांद्वारे सर्वत्र देण्यात आली आहे. मात्र अनेकवेळा सूचना देऊन देखील काम सुरु न केल्याने सुनील माळवे या चंद्रपूर महानगरपालिकेच्या  कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलंय.


पहिल्या दिवसापासूनच सर्वेक्षण चर्चेत...


राज्य मागासवर्ग आयोगाच्या सूचनेप्रमाणे राज्यभरात 23 ते 31 जानेवारी या कालावधीत मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाचे घर निहाय सर्वेक्षण सुरु आहे. यासाठी वेगवेगळ्या शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, पहिल्या दिवसापासूनच हा सर्वे चर्चेत आला आहे. पहिल्या दिवशी अनेक ठिकाणी सर्वे करतांना तांत्रिक अडचणी आल्याने सर्वे बंद पडला  होता. त्यानंतर अहमदनगर शहरात चक्क चतुर्थ श्रेणीत काम करणाऱ्या शिपाई, बिगारी, सुरक्षा रक्षक यांचीही प्रगणक म्हणून नियुक्ती केल्याने गोंधळ उडाला.


अशात अनेक कर्मचाऱ्यांकडे स्मार्टफोन नाहीत, काहींना इंग्रजी, मराठी लिहिता, वाचता येत नसल्याचे समोर आले. सोलापुरात थेट सर्वेक्षणासाठी खाजगी व्यक्तींची नियुक्ती करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे या सर्वेक्षणावरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. 


इतर महत्वाच्या बातम्या