चंद्रपूर:  गेल्या काही महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या माया वाघिणीचा मागमूस काढण्याचा चंद्रपूर वन विभाग (Chadrapur Forest Depatment) कसोशीने प्रयत्न करत आहे. मात्र माया आधी आपल्या राज्यातील अनेक सेलिब्रिटी वाघ (Tiger) अचानक बेपत्ता झाले आहेत आणि वनविभागाला या वाघांचं नेमकं काय झालं याचं स्पष्टीकरण देखील देता आलेलं नाही. 


माया ... क्वीन ऑफ ताडोबा ... (Maya Tigress) जगभरात लाखो चाहते असलेली सेलिब्रिटी वाघीण... माया वाघिणीचे लाखो फोटो-व्हिडीओ समाज माध्यमांवर लोकांनी आजपर्यंत शेअर केले आहेत. तिच्यावर डॉक्युमेंटरी निघाली, डाक विभागाने स्टॅम्प देखील काढला . मात्र ही वाघीण ऑगस्ट महिन्यापासून अचानक बेपत्ता झाली आणि जगभरातील तिच्या लाखो चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं. कक्ष क्रमांक ८२ मध्ये अवशेष सापडले ते मायाचे असण्याची शक्यता आहे. मात्र DNA  मॅच झाले नाही तर पुन्हा प्रश्न अनुत्तरित राहणार की मायाचं काय झालं?  विशेष म्हणजे या आधी देखील आपल्या राज्यात अनेक सेलिब्रिटी वाघ बेपत्ता झाले आहेत. 


आतापर्यंत बेपत्ता झालेले वाघ


यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातील 'वॉकर' या वाघाने 14 महिन्यात टिपेश्वर-अजिंठा-आदिलाबाद आणि ज्ञानगंगा अभयारण्य असा तीन हजार किलोमीटर चा प्रवास केला. मार्च 2020ला त्याला लावलेल्या कॉलरची बॅटरी संपली आणि हा वाघ बेपत्ता झाला. नागपूर जिल्ह्यातील उमरेड-करांडला अभयारण्यातील 'जय' अवघ्या पावणेदोन वर्षाचा असताना रानगव्याची शिकार करणारा मध्य भारतातील सर्वात धिप्पाड वाघ अशी ओळख होती. सचिन तेंडुलकर सारख्या सेलिब्रेटींनी हा वाघ पाहण्यासाठी उमरेड-करांडलाच्या अक्षरशः वाऱ्या केल्या. मात्र एप्रिल 2016 मध्ये जय अचानक बेपत्ता झाला. नागपूर जिल्ह्यातीलच कळमेश्वर-कोंढाळी परिसरातील 'नवाब' वाघ अचानक बेपत्ता झाला.  नावाप्रमाणेच अतिशय देखणा आणि रुबाबदार या वाघाने अमरावती जिल्ह्यात स्थलांतर केलं आणि 2018 मध्ये अचानक बेपत्ता झाला. धक्कादायक म्हणजे वनविभागाला या बेपत्ता झालेल्या वाघांचं नेमकं काय झालं याचं स्पष्टीकरण आजपर्यंत देता आलेलं नाही. 


वाघांची शिकार


पर्यटकांमध्ये लोकप्रिय असल्यामुळे किमान बेपत्ता होणाऱ्या या सेलेब्रिटी वाघांवर सामाजिक संस्था, वन्यजीव प्रेमी आणि मीडियाचं लक्ष तरी जातं... अन्यथा अनेक वाघ मालूम-बेमालूमपणे शिकार होतात. चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यात या वर्षी बावरिया टोळीच्या शिकारीत चार वाघ मारले गेले.  आसाम राज्यात शिकार झालेल्या वाघाची कातडी सापडेपर्यंत आपल्या राज्यातील वनविभागाला याचा पत्ता देखील नव्हता.  दर चार वर्षांनंतर होणाऱ्या सेन्ससचे आकडे जाहीर झाल्यावर वाघ वाढले म्हणून आपण उत्सव साजरा करतो. मात्र दरवर्षी अपघातात, शिकारी मध्ये मृत्युमुखी पडणाऱ्या आणि अशा प्रकारे बेपत्ता होणाऱ्या वाघांवर देखील चिंतन व्हायला पाहिजे.