चंद्रपूर: वर्धा नदीत बुडून तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मृतकांमध्ये चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आणि भाजप नेते गोविंदा पोडे यांचा समावेश आहे. बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव पोडे येथील आज दुपारची ही दुर्दैवी घटना घडली आहे. घरातील व्यक्तीच्या अस्थी विसर्जनासाठी गेल्यानंतर या तिघांचा बुडून मृत्यू झाला. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 


गोविंदा पोडे हे त्यांच्या काकांच्या अस्थी विसर्जनासाठी गावाजवळ असलेल्या वर्धा-इरई नदीच्या संगमावर गेले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीयदेखील होते. यावेळी अस्थी विसर्जनासाठी नदीत उतरलेला त्यांचा मुलगा चेतन पोडे आणि भाचा गणेश उपरे पाण्यात बुडू लागल्याने गोविंदा पोडे यांनी नदीत उडी घेतली. मात्र दुर्दैवाने नदीत बुडून तिघांचाही मृत्यू झाला. 


बचाव पथकाला चेतन पोडे याचा मृतदेह शोधण्यात यश आलं असून इतर दोन मृतदेहांचा शोध सुरु आहे. एकाच कंटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात शोककळा पसरली आहे.


बुडणाऱ्या मैत्रिणींना वाचवण्यासाठी बंधाऱ्यात उडी, तिघीही बुडाल्या


नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील चिंचविहीर गावातील के. टी. बंधाऱ्यावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन तरुणींवर काळाने घाला घातला. पूजा अशोक जाधव आणि खुशी देवा भालेराव या 16 वर्षीय तरुणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.  


कपडे धुताना दुर्घटना


मिळालेल्या माहितीनुसार, पूजा अशोक जाधव, खुशी देवा भालेराव आणि कावेरी भालेराव या तिन्ही मैत्रिणी नेहमी प्रमाणेच कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. चिंचविहीर गावाजवळ असलेल्या के. टी. बंधाऱ्यावर त्या कपडे धुवत होत्या. कपडे धुवत असताना अघटित घडले. पूजा जाधव आणि खुशी भालेराव या दोघींचा अचानक पाय घसरला आणि त्या पाण्यात बुडू लागल्या. त्या दोघी पाण्यात बुडत असल्याचं लक्षात येताच कावेरीनेही तात्काळ पाण्यात उडी घेऊन त्यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, तिला त्या दोघींना वाचवण्यात अपयश आले. 


गावकऱ्यांची घटनास्थळी धाव 


दरम्यान तिने आरडाआरोड करण्यास सुरूवात केली. ही सर्व बाब ग्रामस्थांना लक्षात येताच त्यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली आणि तिन्ही तरुणींना वाचवण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी या तिन्ही तरुणींना बाहेर काढले गेले त्यावेळी  त्या बेशुद्ध अवस्थेत होत्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी पूजा आणि खुशी यांना मृत घोषित  केलं. 


ही बातमी वाचा: