इतकंच नव्हे तर पोलीस चौकशी करून गेले की टोळीतील इतरांना खबर ही पोहोचायची. हे नेमकं कसं घडतंय? याची पोलिसांना कानोकान खबर लागत नव्हती. मोबाईल नंबर वरूनही ट्रेस होत नव्हतं. त्यामुळे पोलीस पुरते हैराण झाले होते, महिला-तरुणी भयभीत झाल्या होत्या. पोलिसांच्या नावाने शिमगा ही सुरू होता. या टोळीला जेरबंद करण्यासाठी सांगवी पोलिसांनी सापळा रचला. काही दिवसांपूर्वी याच सापळ्यात दोन चोरटे फसले. त्यांच्याकडून दहा गुन्हे उघडकीस आले आणि पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला.
पण काही दिवसांच्या अंतराने पुन्हा एकदा चेन स्नॅचिंगचा गुन्हा घडला, पुन्हा तोच फंडा चोरटे अवलंबवू लागले. मग आधी बेड्या ठोकलेल्या दोन्ही चोरट्यांना पोलिसी खाक्या दाखवला गेला आणि चोरीचा नवा आधुनिक फंडा समोर आला. चेन स्नॅचिंग कुठं, कशी आणि कधी करायची यासाठी कसं भेटायचं हा कट पब्जी गेम आणि इन्स्टाग्राम वर रचला जायचा. इतकंच नव्हे तर एकाकडे पोलीस चौकशी करायला आले आहेत याची माहिती इतर सदस्यांना यावरूनच दिली जायची. पोलीस मोबाईल नंबर वरून चोरट्यांचा माग काढतात याची पूर्ण कल्पना असल्याने हा नवा आणि आधुनिक फंडा चेन स्नॅचिंग साठी अवलंबला गेला. पण हा ही फंडा पोलिसांनी खोडून काढला आणि अन्य दोन चोरट्यांना ही जेरबंद करत, या टोळीचा पर्दाफाश केला. त्यांच्याकडून एकूण सतरा गुन्हे उघडकीस आलेले आहेत.