बुलडाणा : तंत्रज्ञानाचा वापर आता शेतीमध्येही मोठ्या प्रमाणात होताना दिसत असून सरकारचा देखील त्यावर भर आहे. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे व्यवहारात पारदर्शकता येण्यास मदत होते. त्याच पार्श्वभूमीवर आता पीक कापणी प्रयोगाचे निष्कर्ष काढण्यासाठी मोबाईल अॅपचा वापर करण्याच्या सूचना कृषी विभागाने प्रत्येक जिल्ह्याला दिल्या आहेत.

पिकांची आणेवारी 50 पैशांपेक्षा जास्त आल्याने अनेक शेतकरी पीक विमा आणि नुकसान भरपाईपासून वंचित राहतात. पीक कापणीची सर्वेक्षण न करताच जास्तीची आणेवारी दाखवली जाते, असे आरोप होतात. दरवर्षी अनेक गावांमध्ये हीच समस्या येते.

हेच बदलण्यासाठी जुन्या पद्धतीला हात न लावता डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर यंदा पीक कापणीत होतोय. यासाठी प्रथमच सीसी अॅग्री नावाचं मोबाईल अॅप तयार केलं गेलंय. बुलडाण्याच्या श्रीरंग सोळंकी यांच्या शेतात अधिकारी याच पद्धतीने पीक कापणी सर्वेक्षण करत आहेत.

दरवर्षी कृषी विभाग, महसूल विभाग आणि जिल्हा परिषदेमार्फेत ही पीक पाहणी आणि कापणी सर्वेक्षण होतं. खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तिनही हंगामात ही पाहणी केली जाते.

सर्वेक्षणात शेतकऱ्याने शेतीला दिलेली खतं, शेती कसण्यासाठी वापरलेलं तंत्रज्ञान, किडनाशकांच्या फवारण्या याची सविस्तर माहिती घेतली जाते. पीक पाहणीनंतर वरिष्ठांच्या उपस्थितीत पिकांची कापणी होते. यामध्ये मिळणाऱ्या उत्पादनाहून प्रतिहेक्टरी पिकाचं उत्पादन काढलं जातं.

सीसी अॅग्री अॅपचा उपयोग

  • अँड्रॉईड अॅपच्या वापरामुळे पीक कापणीत पारदर्शकता येणार आहे.

  • या अॅपवर प्रत्येक शेतकऱ्याच्या नावाने अकाऊंट असेल.

  • प्लॉट पाहणीचे फोटो आणि पिकाची उत्पादकता या अॅपमध्ये टाकावी लागेल.

  • आकडेवारी टाकल्यानंतर त्याची आणेवारी काढण्याचं काम होईल.

  • अॅपच्या आकडेवारीनुसारच उंबरठा उत्पन्न निश्चित केलं जाईल आणि  केंद्र सरकार याच आधारावर शेतकऱ्याला नुकसान भरपाई आणि विम्याचा लाभ देईल.

  • तलाठी, ग्रामसेवकांसह इतर अधिकाऱ्यांना पीक कापणी तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण दिलं जाईल.


 

शेतकऱ्यांना दरवर्षी येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी यंदा पीक कापणी सर्व्हेक्षणात अॅपचा वापर केला जातोय. यामुळे पीक कापणी सर्वेक्षण, पिकाची आणेवारी यात पारदर्शकता येईल. शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झाल्यास सुलभरित्या नुकसान भरपाई आणि विम्याचा लाभ मिळण्यास मदत होईल.