शिर्डी: नोटबंदीच्या निर्णयानंतरही शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी भक्तांनी भरुभरुन दान अपर्ण केलं.. गेल्या नऊ दिवसात तब्बल 9 कोटी 84 लाख रुपयांचं साईंच्या दानपेटीत जमा झालं आहे.


यामध्ये दानपेटी, ऑनलाईन, देणगी काऊंटरवर, मनीऑर्डर आणि सशुल्क दर्शनाच्या माध्यमातून हे कोट्यवधींचं दान जमा झालं आहे. नाताळच्या सुट्ट्या आणि नववर्षाचा मुहूर्त साधत गेल्या नऊ दिवसांत जवळपास 10 लाख भाविकांनी साईंचं दर्शन घेतलं.

25 डिसेंबरपासून शिर्डीत भाविकांची बरीच गर्दी होती. दानपेटीत तब्बल 5 कोटी 35 लाख जमा झाले असून देणगी कांऊटरवर 1 कोटी 45 लाखाचे दान साईंचरणी अर्पण करण्यात आलं आहे. तसेच ऑनलाईन आणि डेबिट कार्डद्वारे तब्बल 34 लाखाचे दान देण्यात आलं आहे.

यासोबतच मनीऑर्डर आणि चेकच्या माध्यमातून 67 लाखाचे दान जमा झालं आहे. तर सशुल्क दर्शनाच्या माध्यमातून 1 कोटी 23 लाख रुपये साई संस्थानाला मिळाले आहेत. पैशांसोबतच 74 लाखाचं सोनं आणि चांदीही साईंना अर्पण करण्यात आली आहे.