Gayatri Shingne vs Rajendra Shingne: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर वेगळा निर्णय घेतलेल्या अजित पवारांसोबत काही आमदार गेले होते. पक्षफुटीनंतर पक्षात शरद पवार व अजित पवार असे दोन गट तयार झाले. लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्या अनुषंगाने अनेक जण सोडून गेलेले आमदार शरद पवार यांच्यासोबत पुन्हा येताना दिसत आहेत. अशातच सिंदखेडराजा मतदार संघातील पक्ष सोडून गेलेले आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात परतणार असल्याच्या चर्चा आहेत.


मात्र, सिंदखेडराजा मतदार संघातील शरद पवार गटाचे निष्ठावंत पदाधिकारी कार्यकर्त्यांसह डॉ.राजेंद्र शिंगणे यांची पुतणी व शरद पवार गटाच्या इच्छुक उमेदवार असलेल्या गायत्री शिंगणे यांनीही डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. त्यामुळे आता आमदार राजेंद्र शिंगणे यांना आता चक्क घरातूनच तीव्र विरोध केला जात असल्याचं चित्र आहे. डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा शरद पवार गटात प्रवेश होणार व उमेदवारी सुद्धा नक्की मिळणार अशी चर्चा असताना आता डॉ. शिंगणे यांच्या पुतणी गायत्री शिंगणे यांनी विरोध दर्शवला आहे.


निवडणूक अपक्ष लढण्याची शक्यता


जे गद्दार खोके घेऊन पक्ष सोडून गेले त्यांना पक्षात घेत असतील तर मग निष्ठावंतांच काय..? असा सवाल उपस्थित करीत डॉ.राजेंद्र शिंगणे यांना गायत्री शिंगणे यांनी विरोध केला आहे. तसेच जर त्यांना उमेदवारी दिली गेली तर मी निवडणूक अपक्ष लढविणार आहे. तर आपण आपल्या निर्णयावर ठाम असल्याची स्पष्ट भूमिका गायत्री शिंगणे यांनी स्पष्ट केली आहे. त्यामुळे आता शरद पवार गटात बंडोखोरीचे संकेत दिसून येत आहेत. विशेष म्हणजे आज आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे सिंदखेड राजा येथे कार्यकर्ते मेळावा घेत आहेत.


अजित पवारांनी पक्षाच बंड केल्यानंतर राजेंद्र शिंगणेंनी शरद पवारांची साथ सोडली. पण, त्यांची पुतणी गायत्री शिंगणे यांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून गायत्री शिंगणे विधानसभा निवडणुकीच्या रिंगण्यात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आता गायत्री शिंगणे यांनी सिंदखेड राजा मतदारसंघात गाठाभेटी, दौरे, आणि गाव परिसर पिंजून काढण्यास सुरूवात केली आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.


2019च्या विधानसभा निवडणुकीत राजेंद्र शिंगणे यांनी शिवसेनेचे शशिकांत खेडेकर यांचा पराभव केला होता. राजेंद्र शिंगणे यांना 81,701 मते मिळाली होती, तर शशिकांत खेडेकर यांना 72,763 मते मिळाली होती. राजेंद्र शिंगणे 8938 मतांनी विजयी झाले होते. अशातच राजेंद्र शिंगणे पुन्हा एकदा शरद पवारांकडे परतणार आणि शरद पवारांकडून त्यांना उमेदवारी मिळणार अशा चर्चा होत असताना गायत्री शिंगणे यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध करत अपक्ष लढण्याची तयारी दर्शवली आहे, ही पक्षासाठी मोठी डोकेदुखी होऊ शकते