बुलढाणा: चिखली विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार श्वेता महाले (Shweta Mahale) यांचा बॉडीगार्ड अजय शंकर गिरी यांने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास त्याने स्वतःवर गोळ्या झाडल्या आणि जीवन संपवलं. अजय गिरी यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलं नसून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
बुलढाणा जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेले अजय गिरी हे आमदार श्वेता महाले यांचे बॉडीगार्ड म्हणून कार्यरत होते. ते सध्या बुलढाणा येथील पोलिस वसाहतीमध्ये राहत होते. त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडल्या. त्यांच्या आत्महत्येमागे नेमकं काय कारण आहे याचा तपास बुलढाणा शहर पोलिस करत आहेत.
घरघुती कारणावरून आत्महत्या केल्याचा अंदाज
आमदार श्वेता महाले यांचे बॉडीगार्ड असलेले अजय गिरी हे आज त्यांच्यासोबत ड्युटीवर नव्हते. त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. अजय गिरी यांनी घरघुती कारणावरून ही आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. पण नेमकं कारण मात्र अद्याप समोर आलं नाही.
अजय गिरी यांची आज साप्ताहिक सुट्टी असल्याने ते आज त्यांच्या बुलढाणा येथील पोलीस वसाहतीतील घरातच होते. दुपारी साडेचारच्या सुमारास अचानक त्यांच्या घरातून फायरिंग झाल्याचा आवाज आल्याने परिसरातील पोलिस नातेवाईकांनी त्यांना सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
अंगरक्षकाने आत्महत्या केल्याची बातमी समजतात भाजप आमदार श्वेता महाले यांनी तात्काळ बुलढाणा येथील पोलिस वसाहतीतील त्यांच्या निवासस्थानी जाऊन नातेवाईकांची भेट घेतली.
ही बातमी वाचा: