बुलढाणा : आपल्याच राज्यात प्रशासनाला मराठीचं वावडं असल्याचं समोर आलं आहे. राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी (CM Ladki Bahin Yojana) मराठीतून अर्ज केल्यास तो रद्द करण्यात यावा असे आदेश देण्यात आले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्याचे तहसीलदारांचे एक पत्र व्हायरल होत आहे. त्यामध्ये हा आदेश देण्यात आला आहे. 


बुलढाण्यातील मोताळा तालुक्यातील तहसीलदारांनी तालुका प्रशासनाला हे आदेश दिले आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी जर मराठीतून अर्ज आल्यास तो तात्काळ रद्द करा असे स्पष्ट आदेश त्यामध्ये देण्यात आले आहेत. बुलढाणा प्रशासनाच्या या आदेशामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 


काय म्हटलंय तहसीलदारांच्या आदेशात? 


मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांनी रोज 500 अर्जाची पडताळणी करायची आहे. सदर काम करताना संजय गांधी योजनेचा लाभ घेत असलेल्या महिला लाभार्थ्याचे अर्ज तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आले तर ते रद्द करण्यात यावेत. तसेच सदर अर्ज मराठीमध्ये असल्यास ते रद्द करण्यात यावेत. 


लाखो माता-बहिणींच्या अर्जाचे काय होणार? 


तहसीलदारांच्या या आदेशामुळे या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांमध्ये मात्र धाकधूक वाढली आहे. मराठीत अर्ज असेल तर तो बाद करावा या आदेशाला आता विरोध होताना दिसत आहे. या आधी लाखो माता-बहिणींनी या योजनेसाठी मराठीतून अर्ज केला आहे. त्यामुळे आपला अर्ज बाद होतो की काय अशी भीती त्यांच्यातून व्यक्त केली जात आहे. त्याचसोबत आपल्याच राज्यात मराठीचा अपमान केला जात असल्याची भावनाही नागरिकांतून व्यक्त होत आहे. 


लाडकी बहीण योजनेत पाच महत्त्वाचे बदल


1) बदललेला पहिला नियम हा रेशन कार्डसंदर्भात आहे. नवविवाहित महिलेचे नाव लगेच रेशन कार्डवर लावणे शक्य होत नाही. त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशनकार्ड हे अत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे. 
2) परराज्यात जन्म झालेल्या व संबंधित महिला सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असेल तसेच या महिलने महाराष्ट्रातील अधिवास असलेल्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर  तर अशा बाबतीत महिलेच्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते. याशिवाय महिलेच्या पतीचे 15 वर्षांपूर्वीचे रेशनकार्ड व 15 वर्षांपूर्वीचे मतदानकार्ड ग्राह्य धरण्यात येणार आहे.
3) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आता पोस्टातील बँक खातेदेखील ग्राह्य धरले जाणार आहे.
4) तसेच योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. 
5) आता सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगवणवाडी सेविका, आशा सेविका, सेतु सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र यांना महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे. म्हणजेच वर नमूद केलेल्या व्यक्ती, आस्थापना महिलांचे अर्ज भरून घेऊ शकतात.


ही बातमी वाचा :