Ravikant Tupkar on Buldana Lok Sabha Elections 2024: बुलढाणा : शेतकऱ्यांचे प्रश्न दिल्ली दरबारी मांडण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) बुलढाणा (Buldana) लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections 2024) लढवणार असल्याचा इशारा दिला आहे. बुलढाणा लोकसभा निवडणूक लढणार आणि जिंकणार सुद्धा, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. 


नवीन वर्षात रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन बुलढाणा लोकसभा निवडणूक लढवणार असून ते संसदेत जातील, असा विश्वास रविकांत तुपकर यांनी 'एबीपी माझा'शी बातचीत करताना व्यक्त केला आहे. याबाबत बोलताना रविकांत तुपकर म्हणाले की, "मी गेल्या 20 वर्षांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संघर्ष करतोय. त्यामुळे मी 100 टक्के संसदेत जाईलच. ज्या प्रश्नासाठी मी लढतोय, त्या प्रश्नाचं मूळ दिल्लीत आहे आणि म्हणून सगळ्या शेतकऱ्यांचा आणि तरुणांचा माझ्यावर दबाव आहे की, तुम्ही लोकसभा निवडणूक लढून दिल्लीला जायला पाहिजे आणि सरकारला आमचे प्रश्न सोडवायला भाग पाडलं पाहिजे. म्हणून येणारी लोकसभा निवडणूक लोकसहभागनं आणि लोक वर्गणीतून आम्ही लढणार आहोत."


'एक व्होट आणि एक नोट' या तत्त्वावर मी निवडणूक लढणार : रविकांत तुपकर 


"100 टक्के मी बुलढाणा लोकसभा निवडणूक लढणार आणि जिंकणार सुद्धा. 'एक व्होट आणि एक नोट' या तत्त्वावर मी निवडणूक लढणार, कारण मी फाटका माणूस, माझ्याकडं पैसे नाहीत. मी भ्रष्टाचार करत नाही. माझ्याकडे नंबर दोनचे पैसे नाहीत.", असं रविकांत तुपकर म्हणाले आहेत. 


"मी स्वतंत्र निवडणूक लढविणार. राजू शेट्टी नेहमीच प्रत्येक निवडणुकीत सहा जागा लढविण्याची घोषणा करतात. यावेळी माझ्या भागातील शेतकऱ्यांचा निर्णय आहे की, लढायचं आणि तेही स्वतंत्र. माझं न्यायालय शेतकरी आहे. त्यामुळे मी लढणार.", असं रविकांत तुपकर म्हणाले आहेत. 


माझी आणि देवेंद्र फडणवीसांची जवळीक नाही, जर... : रविकांत तुपकर 


रविकांत तुपकर म्हणाले की, "नाही, माझी आणि देवेंद्र फडणवीसांची जवळीक नाही. जर जवळीक असती तर माझ्यावर इतके गुन्हे दखल झाले असते का? माझ्या आंदोलनामुळे सरकार घाबरलं आहे. माझ्या आंदोलनाला सरकार नेहमी घाबरतं, जर जवळीक असती तर, आता मला या सरकारनं एक वर्ष तुरुंगात टाकायचं षडयंत्र केलं आहे. मला एका अधिकाऱ्याने खासगीत सांगितलं. आमच्याच काही लोकांनी अफवा पसरविली आहे की, माझी आणि त्यांची जवळीक आहे."


येणाऱ्या निवडणुकीत परिवर्तन अटळ : रविकांत तुपकर 


"मला सर्वच पक्षांकडून ऑफर येत असते. माझी निवडणूक लढवण्याबद्दल राजू शेट्टींशी बातचीत झालेली नाही. आम्ही सोडलं तर शेतकऱ्यांबद्दल कुणीही बोलत नाही. माझं आयुष्य मी शेतकऱ्यांसाठी दिलं आहे, त्यामुळे माझ्यावर शेतकऱ्यांचा विश्वास आहे. येणाऱ्या निवडणुकीतही लढाई राजवाडा विरुद्ध गावगाडा अशी असेल. गाव पातळीवर सध्या प्रस्थापित विरुद्ध रोष आहे. अनेक राजकारणी विरुद्ध मोठा रोष आहे, लोक कंटाळले आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत परिवर्तन अटळ आहे.", असं रविकांत तुपकर म्हणाले आहेत.