Maharashtra Buldhana News: बुलढाणा : येत्या 12 जानेवारीला राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव (Rajmata Jijau Birth Anniversary) बुलढाण्यातील (Buldhana) सिंदखेड राजा (Sindkhed Raja) येथील राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्यात संपन्न होणार आहे. मात्र जिजाऊंचं जन्मस्थळ असलेल्या या राजवाड्याची पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षपणामुळे पूर्ती दुरावस्था झाली आहे. यामुळे आता जिजाऊंच्या वंशजांनी नाराजी व्यक्त केली आहे. येत्या 10 जानेवारीपर्यंत राजवाड्याची सुधारणा केली नाही तर आंदोलन करु असा इशारा जिजाऊंच्या वंशांनी दिला आहे.


अवघ्या काही दिवसांवर राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव सिंदखेड राजा येथील राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्यात संपन्न होणार आहे. मात्र जिजाऊंचं जन्मस्थळ असलेल्या या राजवाड्याची पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षपणामुळे पूर्ती दुरावस्था झाली आहे. यामुळे आता जिजाऊंचे वंशज आणि जिजाऊ भक्तांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. येत्या 10 जानेवारीपर्यंत राजवाड्याची सुधारणा केली नाहीतर, जिजाऊंच्या वंशजांसह जिजाऊ भक्तांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.



राजवाड्याच्या परिसरात घाणीचं साम्राज्य, भिंतीचीही पडझड 


दरवर्षी 12 जानेवारी रोजी राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव त्यांच्या जन्मस्थळी म्हणजे, बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्यात साजरा केला जातो. हा राजवाडा पुरातत्त्व विभागाच्या देखरेखी खाली आहे. मात्र या राजवाड्याची पुरती दुरावस्था झाली आहे. राजवाड्याच्या परिसरात पावसाळ्यात उगवलेलं गवत आणि घाणीचं साम्राज्य आहे, तर परिसरातील स्वच्छतागृहाची ही फार मोठी दुरावस्था झाली आहे. राजवाड्यांच्या भिंतीची आणि कमानींची अनेक ठिकाणी पडझड झालेली आहे. 


जिजाऊंचा जन्मोत्सव आठवडाभरावर येऊन ठेपलेला असतानाही केंद्रीय आणि राज्य पुरातत्व विभागाच्या दुर्लक्षपणामुळे या राजवाडा परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलं आहे. 12 जानेवारीला देशभरातून लाखो जिजाऊ भक्त हे सिंदखेडराजा येथे येत असतात. मात्र पुरातत्व विभाग याबाबतीत गंभीर नसल्यानं आता जिजाऊ भक्त आणि राजे लखोजी जाधव यांचे वंशज आक्रोशीत झाले आहेत. येत्या 10 जानेवारीपर्यंत राजवाड्याची दुरुस्ती केली नाहीतर या ठिकाणी मोठा आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.                


जिजाऊ जन्मस्थळाची दुरावस्था झाल्यानं आता जिजाऊंचे वंशज आणि जिजाऊ भक्त आक्रमक झाले आहे आणि त्यांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे. यावर आता केंद्रीय व राज्य पुरातत्त्व विभाग काय कारवाई करतं? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.