Ravikant Tupkar : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील 30 ते 40 हजार शेतकऱ्यांना (Farmers) अद्याप पीक विमा मिळाला नसल्याचे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी केलं. अनेक शेतकऱ्यांना तफावतीची रक्कमही मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक झाले आहेत. आठ दिवसांत शेतकऱ्यांना पीक विमा न मिळाल्यास पुन्हा एकदा आर या पारचे आंदोलन करण्याचा इशारा तुपकरांनी दिला आहे.


20 मार्चपर्यंत पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा, कृषी अधीक्षकांच्या सूचना


स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आज बुलढाणा जिल्हा कृषी अधीक्षकांची भेट घेतली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 20 मार्चपर्यंत पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना कृषी अधीक्षकांनी AIC कंपनीला दिल्या आहेत. त्यामुळे कंपनी आता 20 तारखेपर्यंत पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार का? हे पाहावं लागेल. जर एका आठवड्यात रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाहीतर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा तुपकरांनी दिला आहे.


अनेक शेतकरी पीक विम्यापासून वंचित


दरम्यान, आम्ही 28 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्हा कृषी अधीक्षकांच्या दालनात केलेल्या आंदोलनानंतर नामंजूर असलेल्या शेतकऱ्यांनाही आम्ही पीक वीमा देऊ असं लेखी आश्वासन कंपनीने दिले होते. त्यानुसार नामंजूर असलेले शेतकरी देखील पीक विम्यापासून वंचित असल्याचे तुपकर यावेळी म्हणाले. बुलढाणा जिल्ह्यातील उर्वरित पीक विम्यासाठी काल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोषजी डाबरे यांची तुपकरांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. 


आंदोलनांमुळे बुलढाणा जिल्ह्यातील 2 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना पीक विमा


आम्ही केलेल्या आत्मदहन आणि जलसमाधी आंदोलनांमुळे आतापर्यंत जिल्ह्यातील 2 लाख 1 हजार 611 शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी 158 कोटी 98 लाख 66 हजार 522 रुपये मिळाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी अत्यल्प रक्कम मिळाली आहे. जिल्ह्यात 7 हजार 513 शेतकऱ्यांना एक हजारापेक्षा कमी पीक विमा मिळाला आहे. तर अनेकांना प्रीमियमपेक्षाही कमी रक्कम मिळाली आहे. त्या शेतकऱ्यांना वाढीव मोबदला मिळावा यासाठी आमच्या कार्यकर्त्यांनी चिखली आणि मेहकर तालुका कृषी अधिकारी यांच्या दालनात केलेल्या आंदोलनानंतर तफावत अहवाल तयार करण्यात आल्याचे तुपकर म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Budget 2023 : अर्थसंकल्प म्हणजे 'बड्या-बड्या बाता अन् शेतकऱ्यांना लाथा', सोयाबीन-कापसाच्या मुद्यावरुन तुपकर आक्रमक