Maharashtra Buldhana News : जनतेच्या समस्यांसाठी किंवा प्रशासनात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी करण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते लोकशाही मार्गानं उपोषण करून आपली मागणी प्रशासनासमोर ठेवत असतात. पण आता तर सामाजिक कार्यकर्ते ही सुरक्षित नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. चक्क उपोषणकर्ताच उपोषण स्थळावरून गायब झाल्याचा प्रकार समोर आल्यानं आता या उपोषणकर्त्याला शोधून काढण्याचं आव्हान बुलढाणा (Buldhana) जिल्हा प्रशासनासमोर उभं राहिलं आहे.
उसे हवा उडा ले गयी, या जमीन खा गयी.....? असा डायलॉग आपण हिंदी सिनेमांमध्ये सर्रास ऐकतो. पण असाच काहीसा प्रकार बुलढाण्यात घडला आहे आणि असाच प्रश्न बुलढाणा जिल्हा प्रशासनाला पडला आहे. बुलढाण्यातील वरवट खंडेराव गावातील ग्रामपंचायतीच्या स्ट्रीट लाईट, नाली बांधकाम इत्यादी कामात ग्रामपंचायतचे ग्रामसेवक अविनाश येनकर यांनी भ्रष्टचार केला म्हणून गावातील सामाजिक कार्यकर्ते संतोष गाळकर यांनी वेळोवेळी संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या. पण त्यांच्या तक्रारींची दखल कोणीच घेतली नाही. चौकशी नाही, कारवाई नाही, म्हणून सामाजिक कार्यकर्ते संतोष गाळकर यांनी संग्रामपूर पंचायत समिती समोर उपोषण करणार असल्याचं रीतसर प्रशासनाला कळवलं. त्यांनी एकट्यानंच उपोषण सुरू केलं. 14 ऑगस्टला संतोष गाळकर पावसाळी दिवस असल्यानं त्यांच्या स्वतःच्या पिकअप गाडीतच पंचायत समिती प्रवेशद्वारावर उपोषणाला बसले. त्यांनी आपल्या मागण्या प्रशासनाला पंधरा दिवस आधीच कळविल्या होत्या.
उपोषणाच्या पहिल्या दिवशी संतोष गाळकर यांच्या उपोषणाची पंचायत समिती प्रशासनानं दखल घेतली नाही. दुसऱ्या दिवशी स्वातंत्र्य दिन होता, त्या दिवशीही दखल घेतली नाही. आणि 15 ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर संतोष गाळकर हे त्यांच्या उपोषणस्थळाहुन बेपत्ता असल्याचं निदर्शनास आलं. संतोष हे ज्या गाडीत उपोषणाला बसले होते, त्या गाडीत त्यांचे कपडे, चप्पल, चष्मा, मोबाईल अशा सर्व वस्तू गाडीतच आढळून आल्या. म्हणून नातेवाईकांनी, मित्र मंडळींनी सर्वत्र शोध घेतला, मात्र सायंकाळपर्यंत त्यांचा काहीच पत्ता न लागल्यानं त्यांच्या मुलानं तामगाव पोलिसांत वडील उपोषणस्थळातून बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. तात्काळ पोलिसांनी प्रकरणाचं गांभीर्य बघून तक्रार दाखल करून दोन पथकं संतोष यांच्या शोधासाठी रवाना केली. मात्र आता तीन दिवस झाले अजूनही संतोष गाळकर यांच्या गायब होण्याचं रहस्य उलगडलं नाही. त्यामुळे ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं आहे. संतोष यांचा मुलगा सुपेश गाळकर यानं आपल्या वडिलांच्या बेपत्ता होण्यामागे ग्रामसेवक अविनाश येनकर आणि पंचायत समिती प्रशासनाचा हात असल्याचा आरोप केला आहे. तसेच, गट विकास अधिकारी संजय पाटील म्हणतात, ते गायब होण्यामागे आम्हाला काही माहिती नाही आणि त्याची जवाबदारी पोलीस प्रशासनाची आहे.
गेल्या तीन दिवसांपासून जनतेसाठी नेहमी झटणारा एक सामाजिक कार्यकर्ता असा अचानक बेपत्ता झाल्यानं परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. कालपासून ग्रामस्थांनी गट विकास अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या दिला आहे. तर पोलीस प्रशासनाची दोन पथकं अहोरात्र बेपत्ता असलेल्या संतोष यांचा शोध घेत आहेत. पण नेमके संतोष गेले तरी कुठे? का त्यांना जमिनींनं गिळलं? की आकाशात उडून गेले? हा प्रश्न प्रशासनाला सतावत आहे.
सामाजिक कार्यकर्ता आणि उपोषणकर्ता असा अचानक बेपत्ता होण्यानं परिसरातील नागरिकांचा आता संयम सुटत चालला आहे. तर प्रशासनानं वेळीच चौकशी करून उपोषणकर्त्याला न्याय दिला असता, तर ही स्थिती उदभवली नसती. नेमक संतोष गाळकर कुठे गेले? ते बेपत्ता झाले की, त्यांना कुणी बेपत्ता केलं? हे शोधण्याचं काम आता प्रशासनानं लवकर करावं. अन्यथा जनतेचा उद्रेक नक्कीच होईल यात शंका नाही.