बुलढाणा: समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) 1 जुलै रोजी खाजगी बसच्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना काल अपघातस्थळीच श्रद्धांजली वाहण्यात आली. स्वामी समर्थ मंडळाकडून शेकडो भक्तांकडून अपघात स्थळी श्रद्धांजली वाहण्यात आली. मात्र त्याचे व्हिडिओ व्हायरल करून पूजा केल्याने अपघात होणार नसल्याचा दावा करणाऱ्या निलेश आढाव या तरुणाविरुद्ध सिंदखेड राजा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. जादूटोणा विरोधी कायद्याच्या कलम 2 आणि 3 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला  आहे. 


एक जुलै रोजी समृद्धी महामार्गावर देव धाबा गावानजीक एका खाजगी बसला अपघात होऊन भीषण आग लागली होती.  या अपघातात 25 प्रवाशांचा होरपळून जागेवर मृत्यू झाला होता या प्रवाशांना श्रद्धांजली म्हणून स्वामी समर्थ केंद्र सिंदखेडराजा यांनी एक श्रद्धांजली कार्यक्रम अपघात स्थळी म्हणजे समृद्धी महामार्गाजवळ  आयोजित केला होता.  या कार्यक्रमाचे आणि पूजेचे व्हिडीओ निलेश आढाव या स्वामी समर्थ केंद्राच्या पदाधिकाऱ्याने समाजमाध्यमात व्हायरल करून अशी पूजाअर्चा केल्याने यापुढे अपघात होणारच नाही असा दावा केला होता. याची दखल सिंदखेड राजा पोलिसांनी घेत या तरुणाविरुद्ध जादूटोणा व अनिष्ट रूढी प्रतिबंधक कायद्याच्या कलम दोन आणि पाच नुसार गुन्हा दाखल केला आहे.


 25 प्रवाशांच्या जिवंत होरपळून मृत्यू झाल्याने या परिसरात भीतीचं वातावरण होतं समृद्धी महामार्गाच्या बाजूला असलेल्या गावात नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती.  त्यामुळे त्यांची भीती दूर व्हावी या हेतूने हा श्रद्धांजली व पूजाचा कार्यक्रम घेण्यात आला होता अशी माहिती स्वतः निलेश आढाव या तरुणाने एबीपी माझाशी बोलताना दिली. आमचा कुठलाही अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही व नव्हता परंतु जर अनावधानाने माझ्या बोलण्याने काही अंधश्रद्धा पसरली असेल तर मी माझे शब्द परत घेतो असे या तरुणाने म्हटलं आहे.


बुलढाण्यातील अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू


नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या खासगी बसचा बुलढाण्यात (Buldhana) भीषण अपघात झाला.  या अपघातात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला तर 8 प्रवासी जखमी झाले आहे.  मध्यरात्री दीड वाजता  समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Mahamarg) पिंपळखुटा गावाजवळ बसचा अपघात झाला. बस पहिल्यांदा लोखंडी पोलला धडकली, त्यानंतर रस्ता दुभाजकाला धडकून पलटी झाली आणि बसने पेट घेतला. बसचा दरवाजा खालच्या बाजूला गेल्याने कोणालाही बाहेर येता आलं नाही. काही प्रवासी बसच्या काचा फोडून बाहेर आले. 25 प्रवाशांचा गाडीमध्येच होरपळून मृत्यू झाला. अपघात झालेली बस विदर्भ ट्रॅव्हल्सची (vidarbha travels) खासगी बस होती. बस रात्री साडे नऊ वाजता यवतमाळहून पुण्याकडे निघाली होती