Buldhana Accident News : बुलढाण्यातील देऊळगाव राजा शहराच्या रामनगर परिसरात टाटा टियागो कार विहिरीत कोसळल्याची दुर्घटना घडली. यामध्ये मायलेकीसह तिघांचा मृत्यू झाला आहे.  कारमध्ये तीन जण होते, त्यामधील चालक सुखरुप बचावला आहे. पण आई आणि मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. चाळीस फूट विहिरीत कारचा शोध घेण्यासाठी गेलेल्या तरुणाचाही मृत्यू झाला आहे. 


विहिरीत पडलेली कार तब्बल सहा तासांच्या शोध मोहिमेनंतर विहिरीतून बाहेर काढण्यात बचावपथकाला यश आलं. कारमध्ये ड्रायव्हिंग सीटवर सीटबेल्ट लावलेल्या अवस्थेत महिलेचा तर पाठीमागील सीट वर मुलीचा मृतदेह आढळला आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.  कार विहिरीमध्ये पडल्यानंतर चालक (पती) पोहून विहीरवर आला. मात्र महिला व लहान मुलगी कार मध्येच अडकले होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस व रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचल्या होत्या. कार पूर्णपणे विहिरीत 40 फूट पाण्यात बुडालेली होती. सहा तासानंतर कारला बाहेर काढण्यात यश आलं आहे. पण कारमध्ये असणाऱ्या आई आणि मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. 


नेमकं काय झालं होतं?


शाळेला सुट्टी असल्याने पत्नीला कार शिकवणे सुरू होते. यादरम्यान कार शिकवत असताना कारवरील पत्नीचे नियंत्रण सुटलं आणि कार थेट विहिरीत जाऊन पडली. यात पत्नी व मुलीचा मृत्यू झाला असून पतीला दवाखान्यात उपचारासाठी भरती करण्यात आलं आहे. तर यावेळी शोध कार्य करणारा पवन पिंपळे नामक युवक हाही या विहिरीत बुडून मरण पावला. ही घटना देऊळगाव राजा येथील रामनगर परिसरात घडली. व्यवसायाने शिक्षक असलेले अमोल मुरकुट यांनी या दिवाळीला टाटा नेक्सन ही कार खरेदी केली होती. स्वतःलाही कार नीट चालवता येत नसताना त्यांनी पत्नीला ही कार शिकवण्याचा घाट घातला. दुपारी बारा वाजता ते आपल्या घरून निघाले होते. पत्नीला ड्रायव्हिंग सीटवर बसवून अमोल मुरकुटे बाजूच्या सीटवर बसले होते. दहा वर्षाच्या मुलीला मागील सीटवर बसवलं होतं. पत्नीला कार शिकवत असताना ब्रेक दाबण्याऐवजी स्वाती मुरकुट यांनी चुकून एक्सलेटरवर पाय ठेवला आणि कार थेट विहिरीत जाऊन कोसळली. जवळपास 70 फूट खोल असलेल्या या विहिरीला 40 फूट पाणी होतं.  बचाव कार्य लवकर होऊ शकले नाही. अमोल मुरकुट हे कारच्या खिडकीतून कसाबसा आपला जीव वाचवत बाहेर पडले. मात्र अमोल मुरकुट यांच्या पत्नी स्वाती आणि मुलगी सिद्धी ही कार सह 40 फूट खोल पाण्यात बुडाल्यात तात्काळ पोलिसांनी रुग्णवाहिका अग्निशमन दल यांना माहिती देण्यात आली. मात्र सहा तासाच्या अथक प्रयत्नानंतर कारसह स्वाती व मुलगी सिद्धी यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. यावेळी बचाव कार्यादरम्यान अजूनही एक युवक जखमी झालेला आहे. अमोल मुरकुट यांच्यावर ग्रामीण रुग्णालय देऊळगाव राजा येथे उपचार सुरू असून याप्रकरणी पोलिसाचा पुढील तपास करीत आहेत.


कार शोधण्यासाठी विहिरीत गेलेल्या तरुणाचा मृत्यू -  


पवन तोतराम पिंपळे ( २४ ) वर्षीय तरुण कार मधील मृतदेह शोधण्यासाठी विहिरीत उतरला असताना बुडाल्याने मरण पावला. तरुणाचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला आहे.