Buldhana Agriculture News : बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील कोराडी (Koradi) आणि पेन टाकळी (Pen takali) या दोन्ही प्रकल्पाचा शेतकऱ्यांना (Farmers) फायदा नसल्याचे वक्तव्य माजी मंत्री सुबोध सावजी  यांनी केलं आहे. या प्रकल्पामुळं भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. याबाबत सुबोध सावजी ( Subodh Saoji) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि विरोधी पक्षनेते अजित पवारांना (Ajit Pawar) एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पाचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही. त्यामुळं या प्रकल्पाच्या कारभाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी सुबोध सावजी यांनी केली आहे.


सुबोध सावजी यांनी नेमकं काय म्हटलंय?


दरवर्षी कालव्याच्या दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र कालव्याच्या स्थितीत सुधारणा नसून, कालवे मोडकळीस आले आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी या संपूर्ण दोन्ही प्रकल्पाची चौकशी करण्याची मागणी माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केली आहे. मेहकर तासुक्यात असणाऱ्या पेन टाकळी आणि कोराडी धरणाच्या सर्व कारभाराची उच्च स्तरीय सीआयडी मार्फत चौकशी करण्याची मागणी सावजी यांनी केली आहे. दोन्ही प्रकल्पाची नियोजीत कामं पूर्ण झाली नाहीत. शासकीय करोडो रुपायंचा खर्च होऊनही शेतकऱ्यांना फायदा मिळत नसल्याचे सुबोध सावजी यांनी पत्रात म्हटलं आहे. हे दोन्ही प्रकल्प अस्तित्वात येऊन बराच काळ झाला आहे. शेवटच्या टोकाच्या शेतकऱ्याला आजपर्यंत शेतीला पाणी मिळाले नाही. ज्या शेतकऱ्यांना अवेळी थोडे फार पाणी मिळाले त्याचा फायदा शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यात झाला नसल्याचे माजी मंत्री सुबोध सावजी यांनी पत्रात म्हटलं आहे.


धरणाचा कारभार ढिसाळ 


मेहकर तालुक्यात पेन टाकळी आणि कोराडी ही दोन मोठी धरणे आहेत. या दोन धरणांच्या माध्यमातून जवळपास 21 टक्के जमिन ओलीताखाली येऊ शकते. परंतू या दोन्ही धरणांचा कारभार इतका ढिसाळ आहे. यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केला आहे. इथे कॅनॉल बरोबर नाही. पाणी सोडण्याचे नियोजन योग्य नाही. त्याचबरोबर या कामांसाठी जो पैसा येतो तो खर्च केला जात नाही. त्यामुळं उरमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांना पत्र दिल्याची माहिती सुबोध सावजी यांनी दिली.   


दोन्ही धरणं 100 टक्के भरुनही शेतकऱ्यांना फायदा नाही


अनेक शेतकऱ्यांना पाणी मिळावं म्हणून आंदोलनं केली. पण त्या आंदोलनाचा काही फायदा झाला नाही. शेतकऱ्यांची पूर्ण पाणीपट्टी माफ केली पाहिजे आणि शेतकऱ्यांना पाणी देणं गरजेचं असल्याचे सुबोध सावजी म्हणाले. आता दोन्ही धरणे 100 टक्के भरली आहे. धरणे 100 टक्के भरुनही शेतकऱ्यांना पाणी मिळत नसल्याचे सावजी म्हणाले. धरणाच्या भिंतीला मोठ्या भेगा गेल्या आहेत. याकडं कोणाचेच लक्ष नसल्याचे सावजी म्हणाले. म्हणून या कामांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. ज्या शेतकऱ्यांना पाणी मिळायला पाहिजे होते, ते मिळालं नाही. पाणी जर मिळालं तर या भागातील शेतकरी सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नसल्याचे मत माजी मंत्री सुबोध सावजी यांनी व्यक्त केलं आहे.  


महत्त्वाच्या बातम्या:


Koradi : कोराडी वीज केंद्राचा अँशपाँड फुटल्याने जीवित हानी नाही, जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी