Samruddhi Mahamarg Accident :  बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात सिंदखेडराजा परिसरात झालेल्या अपघातामध्ये एकूण 25 जणांचा होरपळूण मृत्यू झाला आहे. तर यावर फॉरेन्सिक पथकाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व मृतदेहांची डीएनए चाचणी येण्यास जवळपास पाच दिवसांचा अवधी लागणार आहे. त्यामुळे या सर्व मृतदेहांवर सामुहिक अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. 


फॉरेन्सिक टीमच्या माहितीनुसार, सर्व मृतदेहांची डीएनए चाचणी करण्यासाठी पाच दिवस लागतील. एवढा काळ न थांबता रविवारी सकाळीच सर्व मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यासंदर्भात मंत्री गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे. नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या खासगी बसचा बुलढाण्यात भीषण अपघात झाला.  या अपघातात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला तर 8 प्रवासी जखमी झाले आहे.  मध्यरात्री दीड वाजता  समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Mahamarg) पिंपळखुटा गावाजवळ बसचा अपघात झाला. 


यावेळी माध्यमांशी संवाद साधताना गिरीश महाजन यांनी म्हटलं की, 'याठिकाणी 25 मृतदेह आहेत. त्यांचे नातेवाईकही घटनास्थळी पोहचले आहेत. तर काही नातेवाईक हे लवकरच पोहचणार आहेत. मृतदेहांची अवस्था अत्यंत वाईट आहे. काही मृतदेह हे अर्धवट जळालेले आहेत. काहींचे तर चेहरे देखील ओळखता येत नाहीत.' 


अपघाताची माहिती मिळताच पिंपळखुटा येथील नागरिक मदतीसाठी पोहोचले. दोन वाजताच्या आसपास अग्निशामन दलाच्या गाड्याही पोहचल्या. पोलिसही घटनास्थळावर तात्काळ दाखल झाले होते. रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी जळालेल्या बसमधून मृतदेह बाहेर काढण्यास सुरुवात केली. सकाळी साडेसात वाजेपर्यंत 25 मृतदेह शवविच्छेदनासाठी बुलढाणा शासकीय रुग्णालयाकडे रवाना करण्यात आले.


सरकारकडून मदत जाहीर तर विरोधकांकडून टीकास्त्र


या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला असून केंद्राकडून मदत देखील जाहीर करण्यात आली आहे. लढाणा येथील बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारकडून 2 लाखांची मदत दिली जाणार आहे. तर जखमींना 50 हजारांची मदत दिली जाणार असल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली आहे. तर मुख्यमंत्र्यांकडून देखील अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना मदत जाहीर करण्यात आली आहे.  मृताच्या कुटुंबीयांना पाच लाख मदतीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी देखील अपघातास्थळी जाऊन पाहणी केली आहे. 


दुर्देवी अपघातानंतर राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. शरद पवार, उद्धव ठाकरे, जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे, नाना पटोले आणि संजय राऊत यांच्या इतर नेत्यांनी यावर सरकारला घेरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्यासह सत्ताधारी नेत्यांनी या दुर्दैवी अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे.


हे ही वाचा : 


Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघाताचे कारण इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी शोधलं, 3 महिन्याचे संशोधन