बुलढाणा : लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांच्या सारख्या लोकांना हाताशी धरुन सरकार दंगली घडवू पाहत आहे असा आरोप ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे दीपक केदार यांनी केला आहे. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान राज्यात काही गडबड झाल्यास त्याला राज्य सरकार जबाबदार असेल असा इशाराही त्यांनी दिला. राज्य सरकारने लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची चौकशी करावी, त्यांच्यावर बंदी आणावी अशी मागणी दीपक केदार यांनी केली.


एकीकडे राज्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे 29 ऑगस्टपासून मुंबईत आंदोलन करणार आहेत. त्याचवेळी त्यांच्यावर लक्ष्मण हाके आणि इतर लोकांनी टीकेचा भडीमार सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर दीपक केदार यांनी राज्य सरकारला इशारा दिला.


राज्यात दंगली घडू शकतात


दीपक केदार म्हणाले की, मराठा आरक्षण आंदोलन हे एक सामाजिक आंदोलन असून संतोष देशमुख हत्याकांडाच्या दरम्यान आम्ही मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. येत्या 29 तारखेला मनोज जरांगे हे मुंबईत आंदोलन करणार आहेत. दरम्यान, लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या माध्यमातून 29 तारखेपूर्वी राज्यात दंगली घडवू शकते.


संतोष देशमुखांचे मारेकरी बैठकीत सहभागी


दीपक केदार म्हणाले की, "बीडमध्ये ओबीसी आरक्षण बचाव नावाने एक बैठक झाली. त्यामध्ये संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांचे समर्थक सहभागी झाले होते. त्या माध्यमातून राज्य सरकार दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहे. सामाजिक न्याय आणि अधिकार संविधानाच्या माध्यमातून मागितले तर आम्ही दंगली घडवू, पण तुम्हाला न्याय देणार नाही अशी भूमिका राज्य सरकारने घेतल्याचं दिसतंय."


हाके-वाघमारेवर बंदी आणावी


लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची चौकशी करावे आणि त्यांच्यावर तात्काळ बंदी आणावी. असं झालं नाही तर राज्यात दंगली होण्यासारखी परिस्थिती आहे. राज्यात दंगली व्हाव्यात अशी भूमिका राज्य सरकारची आहे की काय अशी शंका घेण्यास वाव आहे असं दीपक केदार म्हणाले.


शरद पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह


दीपक केदार यांनी शरद पवारांच्या मंडल यात्रेवरही प्रश्नचिन्ह उभं केलं. शरद पवार हे मराठा आरक्षणाच्या विरोधात असल्याचं मराठ्यांना आता कळून चुकलं आहे असेही त्यांनी म्हटलं. मनोज जरांगे यांना पाठिंबा न देता त्यांनी मंडल यात्रा काढली. त्यामुळे लक्ष्मण हाकेच्या भूमिकेत आता शरद पवार उभे आहेत असं दिसतंय.


ही बातमी वाचा: