बीड : सत्ताधाऱ्यांना मराठ्यांना मुंबईत येऊ द्यायचं नाही, त्यासाठी मराठा आणि ओबीसींमध्ये भांडणं लावण्याचं काम केलं जात आहे, पण यावेळी त्यांचा डाव यशस्वी होऊ द्यायचा नाही असं आवाहन मनोज जरांगे यांनी दिलं. आम्ही शांत बसतो म्हणून त्याचा फायदा उचलू नका, आता मुंबईतून आरक्षण घेतल्याशिवाय परत यायचं नाही. यापुढे भाजपच्या एकाही आमदार, मंत्र्याला रस्त्यावर फिरू देऊ नका, आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.

मराठा आणि कुणबी एकच आहे हे सरकारने आधी मान्य केलं होतं. पण आता आरक्षण दिलं जात नाही. हैदराबाद आणि साताऱ्याच्या गॅझेट लागू करावं, 58 लाख नोंदी सापडल्या असतानाही मराठ्यांना आरक्षण दिलं जात नाही, त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली.

ओबीसीमध्ये 29 जाती घातल्या, मराठ्यांना वगळलं

देवेंद्र फडणवीसांनी नुकतेच 29 जाती या ओबीसी आरक्षणामध्ये घेतल्या, त्यांची मागणी नसतानाही त्यांना दिलं. पण मराठ्यांची मागणी असतानाही मराठ्यांना आरक्षण दिलं जात नाही. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी केली जात नाही, ही पोटदुखी कशासाठी? असा प्रश्न मनोज जरांगे यांनी विचारला.

मनोज जरांगे म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस म्हणतात त्यांचा डीएनए ओबीसी आहे, मग शेतकरी ओबीसी नाही का? त्यांना कर्जमाफी करा. देवेंद्र फडणवीस हे ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडण लावत आहेत. आपण जातीयवादी नाही, त्यांनी तसा अपप्रचार केला. आता देवेंद्र फडणवीसांनी कितीही प्रयत्न केला तरी मराठा आणि ओबीसींमध्ये भांडण होणार नाही."

शांततेत जायचं आणि आरक्षण घ्यायचं

मनोज जरांगे म्हणाले की, "मुंबईत शांततेत जायचं आणि शांततेत आरक्षण घ्यायचं. सरकारने आपल्या मोर्चात काही दगडफेक करणारी माणसे पाठवली आहेत. पण आपण त्यांचा हेतू साध्य करू द्यायचा नाही. ही शेवटची फाईट आहे, मुंबईत जायचं आणि आरक्षण घेऊन यायचं."

सरकार काय, सरकारचा बाप आडवा आला तरी आरक्षण घेणार, आणि ते पण ओबीसीतूनच घेणार असा पण मनोज जरांगे यांनी केला. मराठा आरक्षणासाठी आयुष्य पणाला लावलंय, उद्या आरक्षणासाठी अंगाचं कातडं जरी फडणवीसांनी मागितलं तरी ते देणार. जातीसाठी मरण आलं तरी बेहत्तर, मी मरायला घाबरत नाही असं मनोज जरांगे म्हणाले. 

ही बातमी वाचा: