Cotton News : बुलडाणा  (Buldhana) जिल्ह्यात शेतीच्या कामांना सध्या वेग आला आहे. मे महिन्यात लागवड केलेल्या कापूस (Cotton) वेचणीच्या कामाला आता सुरुवात झाली आहे. सध्या बुलडाणा जिल्ह्यात कापसाला चांगला दर मिळत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर दुसरीकडं मजुरांना कापूस वेचणीसाठी प्रति किलो 10 रुपयांची मजुरी मिळत असल्यानं शेतमजूर देखील आनंदात असल्याचे चित्र आहे. एक शेतमजूर दिवसाला 50 ते 60 किलो कापूस वेचून आणतो. त्यामुळं त्यांना दिवसाला 500 ते 600 रुपये  मजुरी मिळत आहे. 


बुलडाणा  जिल्ह्यात मे महिन्यात लागवड करण्यात आलेल्या बागायती कापसाला या वर्षी चांगलाच भाव मिळत आहे. त्यामुळं जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. यावर्षी सुरुवातीलाच कापसाला प्रति क्विंटल 16 हजार रुपयांचा भाव मिळाला आहे. त्यामुळं शेतकरी समाधीनी आहे. मात्र, हा 16 हजार रुपयांचा दर कायम राहावा अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत.  
दरम्यान, सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कापूस वेचणीला सुरुवात होत असते. त्याप्रमाणे यावर्षी देखील कापूस वेचणीला सुरुवात झाली आहे. मजुरांना कापूस वेचणीसाठी प्रति किलो 10 रुपयांची मजुरी मिळत आहे. दिवसभरात एक मजूर साधारणत: 50 ते 60 किलो कापूस वेचतो. त्यामुळं दिवसाला शेतकऱ्याला 500 ते 600 रुपये मिळतात. त्यामुळं शेतमजुर देखील आनंदी असल्याचे पाहायला मिळत आहे.


बुलडाणा जिल्ह्यात चांगला पाऊस


बुलडाणा जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळं तेथील शेतकरी समाधानी आहेत. काही ठिकाणी सुरुवातीच्या काळात अतिवृष्टी झाल्यानं पिकांना फटका बसला होती. पण त्यानंतर पावसाचा जोर कमी झाल्यानं पिकं सध्या चांगल्या अवस्थेत आहे. बुलडाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड केली जाते. त्याचबरोबर सोयाबीनची देखील मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. पण शेतकऱ्यांना कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांचा सामना करावा लागत. यावर्षी देखील काही ठिकाणी अतिवृष्टीचा पिकांना फटका बसला आहे. दरम्यान, सध्या मे महिन्यात लागवड केलेल्या कापसाला बाजारपेठेत चांगला दर मिळत असल्यानं शेतकरी आनंदी असल्याचं वातावरण पाहायला मिळत आहे.


कापसाला यंदा चांगला दर मिळण्याची शक्यता


कापूस महाराष्ट्रातल्या प्रमुख नगदी पिकांपैकी एक आहे. मागच्या वर्षाचा हंगाम संपताना कापसाला 14 हजारांवर भाव मिळाला होता. यावर्षीही कापसाचं पीक शेतकऱ्यांसाठी नवा आशेचा किरण घेऊन आलं आहे. यावर्षी हरियाणा राज्यातील पालवाल जिल्ह्यात या हंगामातील नवीन कापसाची आवक सुरु झाली आहे. इथे कापसाला 10 हजार रुपयांचा दर मिळाला आहे. हरियाणा आणि पंजाबच्या इतर भागात सप्टेंबरपासून नवीन कापसाची आवक वाढेल. यामुळे महाराष्ट्रातही या हंगामात कापसाला चांगला दर मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला असलेली मागणी, कापसाचा वाढलेला पेरा, संभाव्य उत्पादन आणि निसर्गाची साथ यामुळे कापसाला चांगला भाव मिळ शकतो.


महत्त्वाच्या बातम्या: