Buldhana News बुलढाणा :  बुलढाणा शहराच्या (Buldhana News) मलकापूर रोड परिसरात आज सकाळी बिबट्यांचा (Leopard) थरार बघायला मिळाला.  शहरातल्या मिर्झा नगर परिसरात दोन बिबट्यांनी भर वस्तीत शिरकाव केल्याची घटना सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. शहरालगत असलेल्या रानावनात या पूर्वी अनेकदा वन्यप्राण्यांचे दर्शन झाले आहे. मात्र आता दोन बिबट्यांनी चक्क वस्तीत शिरकाव केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. या घटनेनंतर वनविभागाने या बिबट्यांचा बंदोबस्त करवा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.  


बिबट्यांचा भरवस्तीत मुक्तसंचार 


जंगलालगत असलेल्या लोकवस्ती मध्ये जंगली प्राण्यांचा शिरकाव झाल्याच्या अनेक घटना घडत असतात. यात अनेकवेळा मानव-वन्यजीव संघर्ष होऊन त्यात वन्यजीवांसह मनुष्यांचा देखील जीव जात असतो. मात्र असे प्रकार निदर्शनात आल्यास तत्काळ वनविभागाने योग्य ती कारवाई करणे अपेक्षित आहे. शिवाय तत्काळ उपाययोजना केल्या तर संभाव्य घटना टाळल्या जाऊ शकतात. अशीच एक मागणी आता बुलढाणा शहरातील मलकापूर रोड मिर्झा नगर या परिसरातील नागरिकांनी केली आहे.


बुलढाणा शहर हे डोंगररांगांच्या मधोमध वसलेलं शहर आहे. परिणामी या शहराच्या परिघात विपुल प्रमाणात वनसंपदा असून वन्यप्राण्यांचा देखील मुक्तसंचार या जंगलात आहे. त्यामुळे अनेकदा वन्यप्राणी जंगलाची हद ओलांडून मानवी वस्तीत प्रवेश करत असतात. असाच एक प्रकार आज मिर्झा नगर परिसरात घडला. आज 4 जानेवारीच्या पहाटे काही नागरिक  मॉर्निंग वॉकला गेले असता त्यांना 2 बिबटे वस्तीत फिरताना आढळून आले. पहाटे अंधार असल्याने त्यांची प्रथमदर्शनी ओळख पटली नाही. मात्र या बिबट्यांच्या अधिक जवळ गेले असता हे दुसरे तिसरे कुणी नसून बिबट्याच असल्याचे सुनिश्चित झाले. अंगाचा थरकाप उडवणारी हे दृश्य बघून नागरिकांनी इतरांना त्याबाबत सूचना देऊन सजग केले. त्यानंतर या बिबट्यांना पुन्हा वस्ती बाहेर हुसकावून लावण्यात आले. 


बिबट्यांचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद


बिबट्यांचा हा थरार वस्तीत असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. शहराच्या परिघात मोठ्या प्रमाणात जंगल आहेत. या जंगलात अस्वल देखील विपुल प्रमाणात आहे. याआधी अस्वलींनी अनेकदा नागरी वस्तीत शिरकाव केला आहे. सोबतच जंगलाच्या सीमेवर राहणाऱ्या नागरिकांना बिबट्याचे अधूनमधून हमखास दर्शन होत आहे. मलकापूर रोडवरील एसटी वर्कशॉपच्या मागील डोंगरात काही बिबट्यांचा मुक्तसंचार अनेकांनी आपल्या डोळ्यांनी बघितला आहे. बिबट्यांचा अधिवास असल्याने वनविभागाने वेळीच या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या